जब्बार चीनी, वणी: विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हावे अशी शिफारस या आयोगाने केली होती. परंतु काँग्रेस सरकारने आयोगाचा अहवाल मान्य केला नाही. विदर्भाला जबरदस्तीने महाराष्ट्रात सामील केले. तेव्हापासून विदर्भावर अन्याय सुरु झाला व आजही सुरूच आहे. या अन्यायाचा विरोध करून विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हावे यासाठी समितीच्या वतीने विदर्भ राज्य संकल्पदिन साजरा झाला.
राज्याच्या पुनर्रचनेसाठी न्यायमूर्ती फझल अली यांच्या अध्यक्षतेखाली न्या. फझल अली, के एम.पन्नीकर, इंद्रनाथ कुंजरू यांचा तीन सदस्यीय आयोग तयार करण्यात आला होता. राज्य पुनर्रचनेस आयोग न्या. फझल अली कमिशनने 10 आक्टोबर 1955 साली शासनाला अहवाल सादर केला. त्यात त्यांनी म्हटले की विदर्भ हा सधन प्रदेश आहे. या प्रदेशाची संस्कृती वेगळी आहे. या प्रदेशाचा विकास होऊ शकतो. हा प्रदेश केव्हाही महाराष्ट्राबरोबर नव्हता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हाप्रमुख प्रा.पुरूषोत्तम पाटील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून रफीक रंगरेज, कोअर कमिटी सदस्य, पूर्व जिल्हाध्यक्ष नारायण काकडे पाटील, शेतकरी नेते देवराव पाटील धांडे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले की, न्यायमूर्ती फजल अली आयोगाने स्वतंत्र राज्याची शिफारस केल्यावरसुध्दा काँग्रेसने विदर्भातील जनतेची कोणतीही संमती न घेता, चर्चा न करता विदर्भाला महाराष्ट्रात सामील केले. ही विदर्भातील जनतेची घोर फसवणूक आह.
या निमित्ताने तयार केलेल्या नागपूर कराराचेही पालन झाले नाही. त्याचा परिणाम विदर्भाला भोगावा लागत आहे. विदर्भात शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बेकारी ,नक्षलवाद, सिंचन आणि इतर अनुशेष पाहायला मिळतो. काँग्रेसने विदर्भाची अशी फसगत केली, त्यात भाजपही कमी नाही. भाजपनेसुध्दा विदर्भातील जनतेची निराशाच केली. पक्षाच्या 1997 ला भुनेश्वर येथील राष्ट्रीय कार्यकारणीच्या सभेत विदर्भासह छोट्या राज्याच्या निर्मितीचा ठराव पारीत केला; पण कारवाई शून्य.
सन 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीत लिखित आश्वासन दिले की, केंद्र व राज्यात सत्तेवर आल्यावर विदर्भाचे स्वतंत्र राज्य देऊ. पण त्यांनी शब्द पाळला नाही. त्यांनीही विदर्भाशी गद्दारी केली. आता विदर्भाचे स्वतंत्र राज्य घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. असेही प्रा. पुरुषोत्तम पाटील आपल्या भाषणात म्हणालेत.
रफिक रंगरेज, देवराव धांडे, ऍड सूरज महारतळे, नारायण काकडे, दशरथ पाटील याचीही भाषणे झालीत. संचालन राजू पिंपळकर यांनी केले. या कार्यक्रमाला युवक यवतमाळ जिल्हाध्यक्ष राहुल खारकर, शहराध्यक्ष संजय चिंचोळकर, जिल्हा सरचिटणीस मंगेश रासेकर, प्रा. बाळासाहेब राजूरकर, विजयालक्ष्मी अगबत्तलवार, संजय चिंचोळकर, अनिल गोवारदीपे, देवा बोबडे, नितीन शिरभाते यांसह विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)