विलास ताजने, वणी: तालुक्यातील ढाकोरी (बोरी) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शिंदोला सिमेंट कंपनीकडे आर. ओ. प्लांटची मागणी केली होती. त्याअनुषंगाने सिमेंट कंपनीचे जनरल मॅनेजर विजय खटी यांनी ग्रामस्थांची मागणी पूर्ण केली. दि. 12 सोमवारी आरओ प्लांट ग्रामपंचायतीच्या सुपूर्द करण्यात आला.
वणी तालुक्यातील ढाकोरी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अशुद्ध पाण्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत होते. परिणामी ढाकोरी ग्रामपंचायतीद्वारा शिंदोला येथील असोसिएशन सिमेंट कंपनीच्या (ACC) सीएआर व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे आरओ प्लांटची मागणी केली. यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव वैभव कवरासे यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे पाठपुरावा केला.
आमदार बोदकुरवार यांनी एसीसीचे व्यवस्थापक विजय खटी यांना खनिज विकास निधी अंतर्गत आरओ प्लांट मंजूर करण्याबाबत पत्रव्यवहार केला. अखेरीस एसीसीच्या व्यवस्थापकांनी ग्रामस्थांना शुद्ध पाणी पिण्यासाठी आरओ प्लांट उपलब्ध करून दिला. सोमवारी आरओ प्लांट ग्रामपंचायतीच्या सुपुर्द करण्यात आला.
पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे ग्रामस्थांनी सिमेंट कंपनीच्या प्रशासनाचे आभार मानले. यासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव वैभव कवरासे, वामन चिडे, मनोज उरकुडे, अनंता शेंडे, मारोती कवरासे, भास्कर वासेकर, विनोद पायघन, विजय ताजने आदीं ग्रामस्थांनी सहकार्य केले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)