सुशील ओझा, झरीः झेड. पी. ची शाळा म्हणजे खेड्या पाड्यातली शाळा. नव्या टेक्नॉलॉजीपासून दूर असलेली शाळा, असा सामान्यतः गैरसमज असतो. मात्र सुदूर खेड्यातली हीच झेड. पी. शाळेला हायटेक होते. दिल्ली, मुंबईसारख्या मेट्रो सिटींतील शाळांसारखं स्टॅडर्ड मेंटेन केलं. एवढंच नव्हे तर आयएएओ, हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं गुणवत्ता प्रमाणपत्रही मिळवते. ही आहे कायर येथील जिल्हा परिषद शाळा. जिला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅण्डर्डस् हे सर्टिफिकेट मिळालं.
शाळेनेही प्रत्येक बाबतीत गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न केला. इथे अत्याधुनिक कम्प्युटर लॅब आहे. अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा आहे. सुंदर इमारत, खेळाचे मैदान नि साहित्य इथे आहेत. शुद्ध पाणी, आकर्षक बाग, स्मार्ट टिव्हीच्या मदतीने अध्यापन इथे होतं. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढावी यासाठी इथे सुसज्ज वाचनालय आहे. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची इथे व्यवस्था आहे. निसर्गाचा पुरेपूर वापर इथे होतो. किंबहुना इथे सौरविजेचा वापर होतो.
शिस्त नि समन्वयावर इथे भर आहे. स्वच्छता आणि निटनेटकेपणा सर्वच क्षेत्रांत सांभाळला जातो. विविध उपक्रमांमध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचाही सहभाग कसा वाढेल याची काळजी घेतली जाते. ज्ञानरचनावाद, कौशल्यांवर आधारित अध्यापन आणि अध्ययन, विषयमित्र संकल्पना ही शाळेची वैशिष्ट्ये आहेत. आदी अनेक निकषांवर या शाळेला हे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं.
या प्रमाणपत्रानिमित्त एक छोटेखानी कार्यक्रम झाला. यावेळी सरपंच नितीन दखणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज झोडे, केंद्रप्रमुख राजेंद्र कोरडे, विकास निकुरे, मुख्याध्यापक शेकन्ना भिंगावार, शिक्षक कवडू जिवने, गजानन तुरारे, लहू आत्राम, कुमुदिनी देवतळे, ज्योत्सना मानकर, वीणा अरोडा, कीर्ती गंजिवाले, रंजना तुपे उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)