राष्ट्रसंतांच्या वेशभूषेत आता गजाननभाऊ दिसणार नाहीत
सेवानिवृत्त लाईनमन गजानन खोबरे यांचे निधन
सुशील ओझा,झरी: मागील वर्षी तालुक्यातील अडेगाव येथे रामनवमी थाटात साजरी झाली. राष्ट्रसंतांच्या वेशभूषेत असलेले गजाननभाऊ सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होते. यापुढे गजानन खोबरे (70) राष्ट्रसंतांचे वेशभूषेत दिसणार नाहीत. त्यांचे 14 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता उच्च रक्तदाब व हृदयविकाराने निधन झाले. सेवानिवृत्त लाईनमन असलेले गजानन खोबरे हे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते.
मुकुटबन येथील वॉर्ड क्रं 5 मधील विद्यानगरीत गेल्या अनेक वर्षांपासून राहत होते. वीज वीतरण कंपनीत त्यांनी प्रदीर्घ सेवा दिली. वीज वितरण कंपनीत चंद्रपूर, पुसद, मुकुटबन, अडेगाव व इतर ठिकाणी त्यांनी आपली नौकरी चांगल्या प्रकारे केली. कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी तसेच जनतेशी त्यांचे समंध अतिशय मधुर व चांगले होते.
सर्वांशी मिळून मिसळून राहणारे शांत स्वभावाचे ही त्यांची ओळख होती. आपले संपूर्ण आयुष्य वीज वितरणमध्ये नोकरी करून मुकुटबन येथे ते निवृत्त झालेत. खोबरे यांचा उमेश नावाचा एक मुलगा आहे. तोसुद्धा वीज वितरण कंपनीत नोकरी करतो. गजानन खोबरे निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक चांगला कार्यकर्ता म्हणून तालुक्यात मोठे कार्य केले.
राजकारणासोबतच समाजकारणही केले. 2019 मध्ये अडेगाव येथे रामनवमी निमित्त मिरवणूक काढण्यात आली. त्यात त्यांनी संत तुकडोजी महाराजांची वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला होता. त्यामुळेसुद्धा ते मोठे परिचित होते. गजानन खोबरे यांच्या मृत्यूने मुकुटबन व अडेगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे. खोबरे यांच्या मागे पत्नी, दोन मुलं, दोन मुली, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)