गुरुवार 15 पासून आठवडी बाजार “अनलॉक’

किरकोळ व फळभाजी विक्रेत्यांना दिलासा

0

जितेंद्र कोठारी, वणी: “मिशन बिगीन’ अंतर्गत राज्य शासनाने आज गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबरपासून आठवडी बाजार भरवायला परवानगी दिली आहे. कंटेन्मेंट झोन वगळता राज्यभरात इतर ठिकाणी आठवडी बाजार आणि जनावरांचे आठवडी बाजार गुरुवारपासून भरवता येतील. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे फिरस्ती किरकोळ विक्रेते, फळभाजी दुकानदार, शेतकरीवर्ग व ग्रामीण भागांतील ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाय व लॉकडाउन नियमांच्या अधीन राहून शहर व ग्रामीण भागातील आठवडी बाजार पुन्हा एकदा सुरू करण्यात येतील. स्थानिक प्रशासन यासाठी नियम तयार करतील. वणी तालुक्यात वणी, शिरपूर, कायर, मोहदा, शिंदोला, घोन्सा, मारेगांव तालुक्यात मारेगांव, कुंभा, मार्डी तर झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन, पाटण, झरी, शिबला या ठिकाणी आठवडी बाजार भरतो.

यासोबतच वणी, कायर, पाटण या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात गाई, बैल, म्हशी, खरेदी-विक्री करतात. कोरोना महामारीच्या अनुषंगाने मार्च 2020पासून राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आलं. इतर व्यवसायांसह आठवडी बाजार भरविण्यावरही बंदी घालण्यात आली.

शहरांमध्ये जागोजागी वेगवेगळ्या वस्तूंची दुकाने असतात. त्या दुकानांमध्ये सुईपासून तर कारपर्यंत सगळं काही मिळतं. शहरात आपल्याला हवं तेव्हा आपण त्या त्या दुकानात जाऊन हवी ती वस्तू सहज खरेदी करतो. ग्रामीण भागांतील ग्राहक मात्र आजही वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी या आठवडी बाजारावर अवलंबून असतात.

राज्यात आठवडी बाजार भरण्याची परंपरा शेकडो वर्ष जुनी आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी आठवडी बाजाराची भरतात. राज्यात दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप, पूर, महामारी आणि इतर कोणत्याही कारणांनी आजपर्यंत आठवडी बाजार भरण्यास रोखू शकले नाहीत. जीवघेण्या कोरोना आजाराने मात्र आठवडी बाजाराची शेकडो वर्षें जुनी परंपरा खंडित केली.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.