गुरुकुल कॉन्व्हेंटमध्ये ऑनलाईन वाचनप्रेरणा दिवस साजरा
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम ह्यांना आदरांजली
सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट येथे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, वैज्ञानिक, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या 89 व्या जयंती साजरी झाली. झरी तालुक्यातील पहिला ऑनलाइन वाचनप्रेरणा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला.
माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांना आदरांजली म्हणून 15 ऑक्टोबर हा दिवस वाचनप्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. मुलांना वाचनामध्ये गोडी निर्माण व्हावी, वाचनाचे महत्व समजावे, शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी हाच वाचक प्रेरणा दिनाचा उद्देश आहे.
अभ्यास एके अभ्यास न राहता अवांतर वाचनही आवश्यक आहे. तसे त्याचे अनेक फायदेही आहेत. अवांतर वाचनाने अनेक संदर्भ मिळतात. आकलनशक्ती वाढते, व्यक्तिगत विकास तर होतोच. या सगळ्या बाबींची जाणीव शाळेतील उच्च शिक्षित व प्रशिक्षित शिक्षकांना असल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळेच या शाळेचे एकूण 16 विद्यार्थी दहावी बोर्डाच्या गुणवत्ता(मेरिट) यादीत झळकले ही विशेष बाब.
शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सातत्याने प्रयोग आणि प्रयत्नांची गरज आहे. डॉ कलाम म्हणतात, विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकामध्ये ही उच्च गुणांची गरज आहे. तो ज्ञानाने संपन्न असावा, विद्यार्थ्यांशी आपुलकी असावी, जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असावा, केवळ पुस्तकी ज्ञान, शिक्षण देणे एवढेच न करता मुलांची मने उच्च ध्येयाने प्रजवलीत केली पाहिजे.
इलेक्ट्रॉनिक , इंटरनेट प्रसारमाध्यम असलेले झूम ऐप द्वारे ऑनलाइन वाचनप्रेरणा दिवस साजरा करण्यासाठी वर्ग 6 ते 10 वि च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आत्मसात करून हा दिवस साजरा करण्यासाठी शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक सुभाष गजभिये यांनी माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून या ऑनलाईन सोहळ्याची सुरवात केली.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)