विवेक पिदूरकर, शिरपूर: वरझडीच्या जगदंबा देवस्थानात शनिवारपासून नवरात्रौत्सव सुरू झाला. वणीपासून अगदी 13 किलोमीटर अंतरावर हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. कोरोनाच्या महामारीमुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसारच यंदा उत्सव साजरा होईल. त्याच्या अधीन राहूनच संस्थान कमिटीने हा निर्णय घेतला आहे.
वणी परिसरातील भाविकांची वरझडी जगदंबादेवीवर श्रध्दा आहे. वरझडी गावातून मंदिरात जाणारा मुख्यरस्ता वेळू लावून बंद करण्यात आला आहे. शिरपूर पोलिसांनी चौकी लावून कुणी मंदिरात जाणार नाही व गर्दी करणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतली आहे. वरझडी देवी संस्थान तर्फे असे आवाहन करण्यात आले आहे, की कुणीही देवीच्या दर्शनासाठी येऊ नये. महिलांनी देवीची ओटी आपापल्या घरीच भरावी व आराधना करावी.
वरझडी हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून सुपरिचित आहे. वर्षभर लोक इथे दर्शनासाठी आणि सहलीसाठीदेखील येतात. या ग्रामदैवताच्या दर्शनास बाहेरच्या राज्यातील भक्त वर्षभर येतात. यंदा कोरोनाच्या सावटात हा उत्सव होणार आहे. त्यामुळे भक्तांनी आणि नागरिकांनी शक्यतो इथे प्रत्यक्ष येणे टाळावे. असे देवस्थान समितीने कळविले आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)