तहसिलदार यांच्या आदेशाची ठाणेदारांकडून पायमल्ली ?

रेती चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यास चालढकल

0

सुशील ओझा, झरी: सुरदापूर येथील रेती चोरी प्रकरणी तक्रार दाखल होऊनही अद्याप गुन्हे दाखल झालेले नाही. त्यामुळे तहसिलदारांच्या आदेशाची ठाणेदार पायमल्ली तर करीत नाही असा आरोप होत आहे. या प्रकरणी तहसीलदार गिरीश जोशी व नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी गुन्हे दाखल करण्यात अडचण काय आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे.

तालुक्यातील सुरदापूर येथे 25 मे रोजी नायब तहसीलदार आणि पटवारी यांनी गावातील भूमन्ना जंगावार यांच्या घरासमोर 4 ब्रास व गट क्र 5 मध्ये ३ ब्रास असा एकूण 7 ब्रास रेतीसाठा गावकऱ्यासमोर जप्त केला. पोलीस पाटील रवींद्र येल्टीवार यांना तो सुपूर्तनाम्यावर दिला. तहसीलदार यांच्या पत्राच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांनी दुसऱ्या दिवशी काही कर्मचारी रेती आणण्याकरिता पाठविले. तेथील 4 ब्रास रेती रातोरात गायब झाली होती. तेव्हापासून पोलीस आणि महसूल विभागात हा तक्रारीचा खेळ अडकला आहे.

पोलीस पाटील यांनी याबाबत पाटण पोलीस स्टेशनला 11 जुलै रोजी तक्रार दिली. पोलिसांनी सखोल चौकशी केली. या चौकशी दरम्यान तक्रार कर्त्यासह अनेकजण आरोपीच्या पिंजऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. आरोपींमध्ये काही राजकीय लोकांचे नातेवाईक अडकण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने राजकीय दबाव टाकण्यात येत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

ठाणेदार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या पत्रावरून सिद्धीकी नामक पटवारी यांना तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला पाठविले. परंतु त्या तक्रारीत घटनेची तारीख, वेळ, चोरीचा उल्लेख नसल्याने पटवारी सिद्धीकी यांना पत्र देऊन ठाणेदार यांनी परत पाठविले व रितसर तक्रार देण्यास सांगितले. दोन्ही विभागाच्या खेळीवरून जनतेत विविध चर्चा होऊन मोठ्या शंकेला पेव फुटले आहे.

आदेशाची पायमल्ली – तहसिलदार
तक्रार दिल्यानंतर गुन्हे दाखल करणे त्यांचे कर्तव्य आहे. तालुका दंड अधिकारी यांचे आदेश असताना जर कार्यवाही होत नसेल तर ती आदेशाची पायमल्ली आहे. पोलिसांच्या तपासात आरोपी सिद्ध झाले व तक्रारही देण्यात आली. मग गुन्हे दाखल करण्यात अडचण काय असावी हे कळायला मार्ग नाही.
– गिरीष जोशी, तहसिलदार

तक्रारीत त्रुटी – ठाणेदार
या संपूर्ण प्रकरणात तक्रारकर्ता हा संशयाच्या भावऱ्यात आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करीत नाहीये. पटवारी, मंडळ अधिकारी किंवा नायब तहसीलदार यांनी येऊन तक्रार दिल्यास आम्ही गुन्हे दाखल करु. या बाबत दोन पत्र सुद्धा तहसीलदार यांना पाठविण्यात आले आहे.
– ठाणेदार अमोल बारापात्रे

या प्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल होत नाहीये. दोन्ही विभाग प्रकरण एकमेकांवर ढकलत आहेत. या खेळीवरून जनतेत विविध चर्चा होऊन मोठ्या शंकेला पेव फुटले आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.