फाटक्या जोड्यांपासून तर दुबईपर्यंतचा इंटरनॅशनल प्रवास

नाज म्हणजे अभिमान करावा अशीच नाजिया मिर्जा

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः वडील सय्यद मुकद्दर अली सायकलनं वणी ते राजूर रोज प्रवास करीत. घरात पत्नी, शबाना, मुश्ताक, फरीन, जावेद आणि नाजिया ही पाच लेकरं. कष्टानं शरीर झिजत होतं. मुलांकडे पाहिलं की त्यांच्या मनला प्रेरणा मिळत होती.

त्यांना त्यांच्या लेकरांचा नाज म्हणजेच अभिमान आहे. त्यातही एका लेकीचं नावच ‘नाजिया’ आहे. अभिमान करावा अशी असा नावााच अर्थ. खऱ्या अर्थानं तिने आपल्या माहेरच्या आणि सासरच्या आप्तांना नव्हे तर सर्वांनाच अभिमान वाटावा अशी कामगिरी बजावली.

वणीच्या या गुणी लेकीचं नाव आहे नाजिया इमरान मिर्झा. तिचा पायी प्रवास सुरू झाला. ती धावायला लागली. नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या निमित्तांनी तिचा विमानप्रवासही सुरू झाला. सामान्य खेळाडूपासून सुरुवात करणारी नाजिया आंतरराष्ट्रीय स्तरावरचे विद्यार्थी घडवण्याचे कार्य करीत आहेत. फाटक्या जोड्यांपासून सुरू झालेला तिचा प्रवास आंतरराष्ट्रीय यशाकडे वाटचाल करीत आहे.

गरिबीचे दिवस पाहतच नाजिया मोठी झाली. शिक्षणात तिला गोडी आहे. लहानपणी ती शिक्षण पूर्ण करू शकेल की नाही याचीदेखील शाश्वती नव्हती. प्राथमिक शिक्षण वणीतील उर्दू शाळेत झालं. पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण इथल्याच जुन्या गव्हर्मेंट आणि सध्याच्या जिल्हा परिषद शाळेत झालं. नंतर तिने कानपूरला ग्रॅज्युएशन केलं. नंतर तिथेच बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशनची पदवी मिळवली.

लहानपणाासूनच तिला क्रीडाप्रकारांमध्ये इंटरेस्ट होता. त्यात पहिल्यांदा ती उतरली अंडर 14च्या रनिंग कॉम्पिटिशनमध्ये. ती तेव्हा जेमतेम पाचवीला होती. 400 मीटर धावण्याची ती स्पर्धा होती. त्यात ती पहिली आली. पहिल्याच यशाने तिला नवी दिशा दाखवली.

तालुका, जिल्हा आणि स्टेट लेव्हलवरही ती टॉपवरच राहिली. ठाणे येथे झालेली मॅराथॉन असो की, आणि कुठलीही स्पर्धा ती धावतच राहिली. तिची ‘दौड’ सुरू झाली. आज स्पोर्टसमध्ये ती आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन आली.

धावणे म्हटलं की, शूज लागतात. तेही तिच्याकडे नव्हते. कुणाला तरी मागूनच तिला ते शूज मॅनेज करावे लागायचे. प्रॅक्टीस करताना अनेकदा भूक लागायची. बाहेरचं खाणंही परवडणारं नसायचं. कसंतरी चणे-फुटाणे खाऊन तिला तो काळ काढावा लागायचा. पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा तिला स्वस्थ बसू देत नव्हती. अनेक संकटे अथवा समस्या तिच्या पुढ्यात होत्या. पण तिचा विश्वास आणि निश्चय हा अढळ होता.

मुश्किलो से कह दो मेरा खुदा बडा है

यह मत कहो खुदा से तेरी मुश्कील बडी है,  मुश्किलो से कह दो मेरा खुदा बडा है. या विधानावर नाजियाचा विश्वास आहे. संकटांना तोंड देत पुढे जाणं हा तिचा स्वभाव. सेंट्रल रेल्वेत तिला जॉब आला. काही कारणांमुळे तो तिला करता आला नाही.

एक मुलगी स्पोर्टक्षेत्रात काम करते यावरही काही जणांचा आक्षेप होता. तिच्या ड्रेसकोडपासून अनेक गोष्टी बऱ्याच जणांना खटकत होत्या. एक मुलगी टी-शर्ट, ट्रॅकपॅण्ट घालते यावरही प्रश्न उठायचे. पण नाजियाने आपल्या ध्येयापुढे कशाचीच पर्वा केली नाही. खूप तीव्र नाही; पण अधूनमधून किरकोळ विरोध व्हायचे. या ‘मुश्कील’पेक्षाही तिचा खुदा, तिचं ध्येय किती मोठं आहे, हे नाजियाने सिद्ध करून दाखवलं.

तिची रनिंगची प्रॅक्टीस सुरूच होती. प्रचंड मेहनत घेत होती. स्टेट लेव्हल 400, 600 मिटर रनिंगसाठी सिलेक्षन झालं. टेनिंग नागपूरला होतं. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये 2 महिने हे ट्रेनिंग चाललं. अशी सलग दोन वर्षं ती रनिंगमधले नवनवे तंत्र शिकत राहिली.

नागपूरला तिला स्केटिंग करणारी मुलं दिसायची. तिलाही वाटायचं तिची राहण्याची खोली ते स्टेडियम हा प्रवास स्केटिंग शिकलं तर सोपा होईल. झालं, मगं तिने स्केटिंग शिकायला सुरुवात केली. त्यातही ती एक्स्पर्ट झाली. दरम्यान ती स्विमिंगही शिकली. पुढे अॅरोबिक आणि झुंबाही शिकली. सध्या ती वेट लॉसचे ट्रेनिंग देते.

अमरावती जवळील बडनेराचे इमराम मिर्झा यांच्यासोबत नाजियाचं लग्न झालं. वणीत इमरान यांचा व्यवसाय आहे. ती संसारात रमली. वडील सय्यद मुकदृदर अली आणि आई सय्यद रेहाना यांच्या लाडात ती वाढलेली. आपल्या स्वभावाने आणि अंगभूत कौशल्यांनी ती याही नव्या घरात लाडाची झाली.

काही दिवसांतच तिने मिर्जा परिवाराचं मन जिंकलं. आपली सून टॅलेंटेड आहे, हे तिचे सासरे जामीन बेग यांच्या लक्षात आलं. त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं. नाजिया तर म्हणते, की तिचे सासरे हे तिला बापाची माया लावतात. पती इमरान मिर्जा यांचाही तिला सपोर्ट आहेच. सासू शाहीन मिर्जा ह्यादेखील तिला पूर्ण सहकार्य करतात.

चूल आणि मूल याही पलीकडे तिने आपलं कार्य सुरूच ठेवावं असं तिच्या नव्या परिवाराला वाटायचं. अयान आणि अरहान ही दोन लेकरं. हेदेखील इंटरनॅशनल बूक ऑफ रेकॉर्डसपर्यंत जाऊन आलेत. मुलं झाल्यानंतर तिने वणीतील सुशगंगा शाळा जॉईन केली.

शारीरिक शिक्षक म्हणून तिची कारकीर्द सुरू झाली. काही काळापुरतं थांबलेलं तिचं क्रीडाक्षेत्रातलं काम पुन्हा सुरू झालं. ती शाळेत विविध क्रीडाप्रकार शिकवते. तिलाही नवनवं काही यातून शिकायला मिळतं. तिने विद्यार्थ्यांवर खूप मेहनत घेते. याचंच फळ म्हणून तिचे दोन विद्यार्थी इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत खेळून आलेत.

नजियाचा क्रीडाक्षेत्रातील प्रवास निरंतर सुरूच आहे. रोलर बास्केटबॉल फेडरेशन इंडिया असोसिएशनशी ती जुळली. बलविंदरसिंग यांच्यासोबत ती जुळली. दुबई, नेपाळमध्ये तिचे विद्यार्थी सुवर्णपदकांचे मानकरी ठरलेत. नाजिया आदर्श पत्नी, आई, सून आणि टीचर आहेच. अनेक छंदही ती जोपासते. पुढे जाणे हा तिचा गुणधर्म. म्हणूनच की काय, तिला बाईक आणि फोरव्हीलरही चालवायला आवडते. ती शक्ती आहे. तिचा प्रवास सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल.

आम्हाला नाजियाचा ‘नाज’ आहे: प्रदीप बोनगिरवार
गेल्या 15 वर्षांपासून मी नाजियाचा संघर्ष आणि धडपड पाहत आहे. तिला खेळामध्ये खूप आवड आहे. ती प्रचंड क्षमतेची आहे. ध्येयाने झपाटलेली नाजिया विविध प्रयोग करीत असते. तिने आपल्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय भरारी घेतली. विद्यार्थ्यांनाही तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे नेलं. विद्यार्थ्यांप्रती तिला खूप आपुलकी आहे. ती उत्कृष्ट शिक्षिका आहे. विद्यार्थ्याना आकर्षित करण्याचं, शिकवण्याचं तिचं स्कील वाखाणण्यासारखंच आहे. केवळ संस्था संचालकम्हणूनच नव्हे, तर एक वणीकर म्हणूनही आम्हाला तिचा ‘नाज’ आहे.
: प्रदीप बोनगिरवार, अध्यक्ष, स्वावलंबी शिक्षण संस्था, सुशगंगा गृप, वणी
 

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.