‘स्मशानभूमीच्या नियोजित जागेत विकासकामे करा’
राजूर ग्रामवासीयांची मागणी, बीडीओंना निवेदन....
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील 12 हजार लोकसंख्या असेलेले राजूर हे गाव आहे. परंतु या ठिकाणी अंत्यविधी करण्याकरिता कोणतीही व्यवस्था नाही. शासनाने स्मशानभूमीसाठी जागा दिली असली तरी त्या ठिकाणी कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाही. या ठिकाणी अंत्यविधीसाठी सुविधा देण्यात याव्या याकरिता राजूर ग्रामवासीयांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
राजूर येथे स्मशानभूमीकरिता जी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्या जागेवर एका इसमाने अतिक्रमण केले होते. त्या अतिक्रमीत जागेचा त्याने शेती करण्याकरिता उपयोग केला होता. पुढे या शेतीची कायदेशीररित्या मोजणी करण्यात आली व नियोजित जागा वेगळी करून ग्रामपंचायतीने कंपाउंड केले.
अतिक्रमण जरी उठवण्यात आले असले तरी अंत्यविधीसाठी ही जागा अद्यापही खुली करण्यात आलेली नाही. या ठिकाणी प्रेताला जाळण्याची किंवा पुरण्याची व्यवस्था नाही. या ठिकाणी वीज, रस्ता उपलब्ध नाही. 12 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात स्मशानभूमी नसने ही फार मोठी शोकांतिका आहे. अजूनही राजूर ग्रामवासी इतर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतात. नियोजित जागेत विकासकामे करून ती जागा अंत्यविधी साठी राजूर ग्रामवासीयांना देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
या संदर्भांत 5 मे 2017 ला ग्रामसभेत ठराव घेण्यात आला. त्यावेळी एका वर्षांपूर्वी शासनाने स्मशानभूमी करीता जागा उपलब्ध करून दिली. परंतु अजूनही या जागेची सफाई, सौंदर्यीकरण करण्यात आले नाही. असा आरोप ग्रामवासीयांना केला आहे.