‘त्या’ शेतकऱ्याच्या न्यायाचा चेंडू भुजल सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या हातात

आरसीसीपीएल सिमेंट कंपनीने फेटाळली शेतकऱ्याला मदत

0

सुशील ओझा, झरी:  झरी तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीद्वारा घडवून आणलेल्या स्फोटांमुळे शेतातील बोअरवेल खचल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकरी संजय यशवंत आसुटकर यांनी केला आहे. यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्याने कंपनी अधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र दंडुकेशाही कंपनी अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. परिणामी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने योग्य न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे  तक्रार दाखल केली आहे.

मात्र नुकसानग्रस्त शेतकरी दोन महिन्यांपासून न्यायासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहे. आता निर्णयाचा चेंडू भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हातात आहे. संबंधित अधिकारी काय निर्णय देतात. याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहेत.

झरी तालुक्यातील मुकुटबन येथील शेतकरी संजय यशवंत आसुटकर यांचे पिंप्रडवाडी शिवारात (गट क्रमांक 53/1) तीन एकर शेत आहे. ओलितासाठी  शेतात बोअरवेल आहे. आसुटकर यांच्या शेतालगतच्या परिसरात सिमेंट कंपनीने कच्च्या मालाचे उत्खनन सुरू केले आहे.

सप्टेंबर महिन्यात कंपनी द्वारे उत्खननासाठी केलेल्या स्फोटा दरम्यान प्रचंड कंपन होऊन शेतातील बोअरवेल खचली. सभोवती पाच फूट खोल खड्डा पडला आहे. बोअरवेल निकामी झाल्याने पिकांना पाणी देणे बंद झाले. यात संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सदर शेतकऱ्याचा उदरनिर्वाह फक्त शेतीवरच अवलंबून आहे. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ‘तो मी नव्हेच’ ची भूमिका घेत नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित हताश शेतकऱ्याने योग्य न्याय मिळवून देण्यासाठी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले. 

त्याअनुषंगाने झरी तालुक्याचे नायब तहसीलदार यांनी 21 ऑक्टोबरला घटनास्थळाची पाहणी केली. परंतु सदर बाब तांत्रिक असल्याचे मत नोंदवित वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, यवतमाळ विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थळ निरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे पत्र तहसीलदार जी. एम. जोशी यांनी दिले.

मात्र अजूनपर्यंत भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. बोअरवेल खचल्याने सदर शेतकऱ्याचा यंदाचा खरीपासह रब्बी हंगाम वाया गेला आहे.

केवळ शेतीवरच कुटूंबाचा उदरनिर्वाह असल्याने कुटुंब जगवायचे कसे ? असा यक्षप्रश्न शेतकऱ्यापुढे निर्माण झाला आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य न्याय मिळवून देण्याची मागणी संजय आसुटकर यांनी केली आहे.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.