जितेंद्र कोठारी, वणी: मागील अनेक वर्षांपासून बंद असलेली येथील रसोया प्रोटीन प्रा.लि. कंपनी लवकरच पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. नागपूर येथील गोयनका प्रोटिन्स समूहाने 15 डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात तब्बल 16 कोटींमध्ये रसोया प्रोटिन्स कंपनी विकत घेतली आहे.
रसोया ब्रँड सोयाबीन तेलासह रसोया आटा व अन्य उत्पादन तयार करणाऱ्या रसोया प्रोटीन्स लिमिटेडची स्थापना 1992 साली करण्यात आली. अनिल लोणकर यांच्या मालकीची रसोया प्रोटिन्स कंपनी वर्ष 2017पर्यंत सुरळीत सुरू होती.
मात्र कामगारांच्या नावावर बँकेतून परस्पर 20 कोटींचे कर्ज काढल्याचे प्रकरण उघड झाल्यावर कंपनीवर अवकळा आली. वर्ष 2018 मध्ये रसोया कंपनीवर टाळे लागले. सोबतच कंपनीत काम करणारे 300 ते 400 कामगार बेरोजगार झाले होते.
बंद पडलेली रसोया प्रोटिन्स कंपनी एकदा पुन्हा नव्या नावाने व नव्या जोमाने सुरू होणार याची जाणीव होताच कंपनीतील जुन्या कामगारांची आशा पल्लवित झाली आहे.
वणी तालुक्यात कोळसा उत्पादनाव्यतिरिक्त अन्य मोठे उद्योग नाहीत. तालुक्यात रसोया प्रोटिन्स व त्यानंतर जी. एस. ऑइल मिल्स हे दोन मोठे सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यानंतर या भागातील कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादनाकडे वळले होते. तसेच काही प्रमाणात रोजगारचा प्रश्न सुटला होता. मात्र एका पाठोपाठ दोन्ही उद्योग बंद पडले. आता ही फॅक्टरी सुरू होत असल्याने अनेकांना पुन्हा रोजगारांच्या संधी मिळतील.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा