वणीतील ‘त्या’ गोळीबाराला झाले 49 वर्ष पूर्ण
आंदोलनादरम्यान बेछुट गोळीबार. 7 लोक झाले होते हुतात्मा
बहुगुणी डेस्क, वणी: नवीन वर्षांची सुरुवात चांगली व्हावी अशी सर्वांची अपेक्षा असते. मात्र 49 वर्षापूर्वी वणीत नवीन वर्षाची सुरवातच रक्तरंजीत झाली. विरोधी पक्षातर्फे महागाई, अन्नधान्यावर लावण्यात आलेले विविध निर्बंध उठवावे तसेच कापसाला योग्यभाव द्यावा इ मागणीसाठी 2 जानेवारीच्या दिवशी फॉरवर्ड ब्लॉक, कम्युनिस्ट, रिपब्लिकन पक्ष व काही समाजवादी संघटनातर्फे ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्रात हे आंदोलन शांततेत पार पडलं. मात्र वणीत हे रक्तरंजीत होणार याची कुणालाही कल्पना नव्हती. या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या बेछुट गोळीबारात 7 लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो लोक आणि पोलीस जखमी झाले होते.
वणीच्या इतिहासात दोन अमानुष गोळीबाराचा कामय उल्लेख होतो. त्यातील काही वर्षांपूर्वी झालेला एपीएमसी मार्केट येथील गोळीबार अनेकांनी बघितला आहे. मात्र त्यापेक्षा अमामुष गोळीबार हा 49 वर्षांपूर्वी झालेला गोळीबार होता. त्या घटनेचे साक्षीदार असलेले लोक आजही त्याची दाहकता सांगतात शहारून जातात.
2 जानेवारी 1974 रोजी सकाळी महागाई व शेतमालाला भाव मिळावा या मागणीसाठी सकाळी शहरातील टिळक चौकात विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरूवात झाली. मुख्य चौकातून नारेबाजी करत आंदोलक शहरातील बसस्टॅंड (जुने बस स्टँड) परिसरात गेले. तिथे जाऊन आंदोलकांनी बस बंद करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काही बसवर आंदोलकांनी दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी विरोधी पक्षातील 6 प्रमुख नेत्यांना अटक केली. यात तत्कालीन अपक्ष आमदार स्वर्गीय दादासाहेब नांदेकर, कम्युनिस्ट नेते शंकर दानव यांचाही समावेश होता.
नेत्यांना अटक झाल्याचे कळताच कार्यकर्ते संतप्त झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. दुपारी 12 वाजताच्या दरम्यान बंदोबस्तासाठी आलेले शिरपूर पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर तिवारी हे मोटार सायकलने कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्याकडे येताना दिसले. चौकात आंदोलकांनी त्यांची गाडी थांबवली. कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसताच त्यांनी मोटार सायकल तिथेच ठेवून तिथून पळ काढला व ते जवळच असलेल्या वन विभागाच्या कार्यलयात लपले. काही कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग केला. असं म्हटलं जातं की बचावासाठी तिवारी यांनी आंदोलकांवर पिस्तुल रोखली.
आंदोलनाला हिंसक वळण
संतप्त झालेल्या आंदोलकांनी तिवारी यांच्या मोटार सायकलला व वनविभागाच्या कार्यालयाला आग लावली. दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे कळताच पोलिसांनी अटक केलेल्या नेत्यांची सुटका केली व आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. आंदोलक शांत झाले व घरी परतू लागले. मात्र त्याच वेळी अचानक परत जाणा-या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला.
लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले. गोळीबारात तीन लोक जागीच ठार झाले तर 16 लोक गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही तासातच त्यातील तिघांचा मृत्यू झाला तर त्यानंतर एक व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशा 7 लोकांचा या गोळीबारात बळी गेला.
गोळीबारानंतर माजली लुटमार
गोळीबारानंतर शहरातील वातावरण आणखी चिघळले. संतप्त आंदोलकांनी काँग्रेसच्या काही नेत्यांच्या घराला आग लावली. या परिस्थितीचा फायदा काही समाजकंटकानी घेतला. शहरात लुटमार सुरू झाली. शहरातील मुख्य मार्केट असलेले संपूर्ण गांधी चौकातील दुकानं लुटली गेली. दोन धान्याचे गोदाम लुटण्याचाही प्रयत्न झाला. याशिवाय पंचायत समितीचे सभापती बळीभाऊ सातपुते यांना अमानुष मारहाण करण्यात आली.
आंदोलकांसह सर्वसामान्यांनीही गमावला जीव
यात गोळीबारात केवळ आंदोलकच नाही तर ज्यांचा आंदोलनाशी संबंध नव्हता अशा व्यक्तींचाही नाहक बळी गेला. राजेश चिंडालिया (17) हा तरुण पेपर आणायसाठी गेला होता. विराणी टॉकिजचे सुपरवायझर भास्कर मांडवकर (24) हे ड्युटी करून परतत होते. यासह वासुदेव वाघ (22) कवडू सुतसोनकर (25) पुनाजी गिरडे (55) रामकृष्ण झिलपे (40) दौलत पुंड (50) यांचा या गोळीबारात मृत्यू झाला. याशिवाय यात शेकडो लोक जखमी झाले. यात 20 पोलिसांचाही समावेश होता.
इंदिरा गांधींनी फिरवली वणीकडे पाठ
घटनेनंतर शहरात कलम 144 लावण्यात आले. शेकडो आंदोलकांवर दंगल पसरवल्याचा आरोप ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले. आंदोलन शांत व्हावे यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष स्व. बाबुरावजी देशपांडे यांनी प्रयत्न केले. संध्याकाळपर्यंत तत्कालिन इब इन्सपेक्टर तिवारी यांना निलंबीत करण्यात आले. घटनेच्या दिवशी इंदिरा गांधी यांचा विदर्भ दौरा होता. त्या नागपूर येथून पवनार येथे गेल्या होत्या. त्यांना गोळीबाराची माहिती देण्यात आली होती. मात्र त्यांनी वणीकडे पाठ फिरवली तसेच या घटनेचा त्या दिवशीच्या भाषणात उल्लेख देखील केला नव्हता.
ती घटना अंगावर काटा आणणारी होती: कॉ. शंकरराव दानव
आंदोलन शांततेत पार पडले होते. मात्र माझ्यासह काही नेत्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचे काही कार्यकर्ते बस स्थानक परिसरात गेले होते. तिथे काही असामाजिक तत्वही पोहोचेलले होते. त्यांनी बस जाळण्यास सुरवात केली. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला होता. अहिंसकपणे आंदोलन करणा-या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार वर्षांनी शरद पवार यांचे पुलोद सरकार आले. नवीन आलेल्या सरकारने आंदोलकांवर दाखल असलेले सर्व गुन्हे मागे घेतले. आजही ती घटना आठवली की अंगावर काटा येतो.
– कॉ. शंकरराव दानव, कम्युनिस्ट नेते
मृतकांच्या सन्मानार्थ हुतात्मा स्मारक
नाहक बळी गेलेल्या सात व्यक्तींच्या सन्मानार्थ शहरातील त्याच परिसरात हुतात्मा स्मारक तयार करण्यात आले. त्या स्मारकावर या सातही व्यक्तींची नावे कोरली आहेत. आधी हे स्मारक शिवतीर्थ येथे होते. त्यानंतर हे स्मारक शेजारीच पोस्ट ऑफिस जवळ आहे. हे स्मारक आजही दुर्लक्षीत आहे.
(नोट: पूर्व प्रकाशित अपडेटेड आर्टिकल)