विवेक तोटेवार, वणी: शुक्रवार 29 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास वरोरा बायपासवर दारुची तस्करी करणारे एक वाहन पकडण्यात आले. या कारवाईत 31 पेट्या देशी दारू जप्त करण्यात आल्या असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वणी पोलिसांना खबरीकडून मारेगाव येथून वरोरा येथे दारूची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बायपासवरील नांदेपेरा चौफुली येथे सापळा रचला. दरम्यान संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास एक मॅक्सिमो गाडी (MH29 T5667) येताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये 31 पेटी देशी दारू आढळून आली.
या प्रकरणी आरोपी रूपेश शंकर आत्राम रा. गोकुलनगर व अक्षय महादेव आवारी यांना अटक करण्यात आली आहे. तर मॅक्सिमो गाडी जप्त करण्यात आली आहे. या कार्यवाहीत सदर दारू किंमत 80 हजार 184 रुपये व गाडी किंमत 4 लाख असा एकूण 4 लाख 80 हजार 184 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमच्या कलम 65 (अ), (इ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुदर्शन वनोळे करीत आहे. सदर कारवाई ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख पोऊनी गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार यांनी केली.
हे देखील वाचा:
सशस्त्र सेना दलात निवड झालेल्या युवक-युवतींचा प्रजासत्ताक दिनी गौरव