पंचायतराज समितीच्या धास्तीने कार्यालयात कागदपत्रांची जुळवाजुळव
झरी तालुक्यात विविध कार्यालयात अधिकारी व कर्माचा-यांची धावपळ
सुशील ओझा, झरी: जिल्ह्यात 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान पंचायतराज समिती धडकणार आहे. त्यानंतर तालुका व गावपातळीवरील कामांची पाहणी केली जाणार आहे. समितीच्या धास्तीने शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत कार्यालय, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग इत्यादी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे दाबे दणाणले आहे. त्यामुळे दिवस रात्र एक करून कागदाची जुळवाजुळव करणे सुरू असल्याचे चित्र तालुक्यातील विविध कार्यालयात पहायला मिळत आहे. जर पंचायतराज समितीने चौकशी केल्यास विविध कामांतील भ्रष्टाचार उघड होऊ शकतो असे बोलले जात आहे.
विकासकामे, शासकीय योजनेतील झालेली कामे, सुरू असलेली कामे, आलेला निधी, निधींचे वाटप, खर्च याची जुळवा जुळव करण्याच्या कामी अधिकारी व कर्मचारी वर्ग लागला आहे. तालुक्यातील विविध योजनेतील रस्त्याची कामे ,शाळेचे वॉलकंपाउंड, औषधी साठा, चावडीचे काम, अनेक जी.प शाळेतील भ्रष्टाचार, ग्रामपंचायत इत्यादींच्या अनेक कामात सावळागोंधळ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचा-यांची चांगलीच धावपळ सुरू आहे.
पंचायत राज समितीने वरील विभाग व लेखासंहीतेच्या उल्लंघनासह अनेक योजना मध्ये कसुन चौकशी केल्यास अनेक बोगस कामे उघड होण्याची शक्यता आहे. अनेकदा पंचायत राज समिती तालुक्यात येणार असे असताना वेळेवर दौरा रद्द झाल्याने अनेक अधिकारी व कर्मचारी सुटकेचा श्वास घेत होते. परंतु या वेळी पंचायत राज समिती येण्याचे निश्चित आहे. तसेच ती कोणत्या तालुक्यात किंवा गावात धडकेल याची निश्चित शास्वती नाही. समितीने कसून चौकशी केल्यास झालेल्या कामातील भ्रष्टाचार उघड होण्याची भीती अधिकारी व कर्मचारी वर्गात आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील कर्मचारी व अधिकारी वर्गाचे टेंशन वाढले आहे.
हे देखील वाचा:
सेक्स रॅकेटचे पाळंमुळं शोधून काढण्याचे पोलिसांपुढे आव्हान (भाग 3)