जातीय सलोखा व सामाजिक एकता वृद्धिंगत व्हावी
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांचे प्रतिपादन
जब्बार चीनी, वणी: आपल्या देशातील राज्यघटना ही परिपूर्ण आहे. या राज्यघटनेमुळे देशातील विविधतेत एकता आहे. अनेकता मध्ये एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. यातील जातीय सलोखा व सामाजिक एकता वृद्धिंगत व्हावी अशी अपेक्षा यवतमाळचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी व्यक्त केली. ते येथील पोलीस स्टेशन परिसरात शिवजयंती निमित्त आयोजित शांतता समितीच्या सभेत बोलत होते.
वणी येथे आयोजित शांतता समितीच्या सभेत अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, तहसीलदार विवेक पांडे उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक येथील ठाणेदार वैभव जाधव यांनी करून सभेची पार्श्वभूमी विशद केली.
सभेच्या सुरुवातीला डॉ. भुजबळ यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल येथील शांतता समितीच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर नीलिमा काळे, गजानन कासावार, प्रा. पुरुषोत्तम पाटील, नारायण गोडे, अजय धोबे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून वणीच्या समृद्ध सांस्कृतिक व सामाजिक परंपरेचा उल्लेख करून येणाऱ्या शिवजयंती उत्सव वणीकर नागरिक शांततेत पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर डॉ. शरद जावळे यांनी कार्यक्रमासाठी शासनाच्या आदेशानुसार आवश्यक काळजी घेऊन शंभर व्यक्तीसाठी परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषण करतांना डॉ. भुजबळ पुढे म्हणाले की, दि. 25 मार्च पासून संपूर्ण देश कोरोनामुळे बंद झाला होता. असा प्रसंग आपल्या देशाने पहिल्यांदा अनुभवला आहे. जगाच्या तुलनेत आपण प्रभावीपणे कोरोनवर नियंत्रण मिळविले आहे. पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेची उपस्थितांना आठवण करून देऊन या प्रतिज्ञेतील प्रत्येक ओळ ही मार्गदर्शक असून यात आपल्या देशाच्या सुख समृद्धीची व एकतेची किल्ली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांची काव्यपंक्ती उद्धृगृत करून ही तर्पणची भूमी आहे. ही अर्पणची भूमी आहे असे अभिमानाने सांगितले.
या प्रसंगी युवा सेनेने जिल्हा पोलीस अधीक्षकांचे स्वागत केले. त्यासोबत शांतता समितीच्या सदस्य मंगलाताई झिलपे या वेळोवेळी पोलीस विभागाला साक्षदार म्हणून सहकार्य करतात त्याबद्दल त्यांचाही सन्मान केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड यांनी केले. आभार प्रदर्शन शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले यांनी केले.
हे देखील वाचा: