संचारबंदीत वणीकरांच्या चिकन मटणवर उड्या…

शहरात लॉकडाऊन यशस्वी तर संचारबंदीला हरताळ

0

विवेक तोटेवार, वणी: कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन शनिवार सायंकाळी 5 ते सोमवार सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र आज रविवार असल्याने वणीकरांनी चिकन मटणच्या दुकानावर उद्या मारल्या. दीपक चौपाटी, श्याम चौपाटी परिसरातील काही चिकन मटणचे दुकानं सुरू होते. लपून छपून सुरू असलेले तुरळक वगळता शहरात संपूर्ण लॉकडाऊन पाळले गेले. आठवडी बाजारासह खासगी वाहतूक देखील बंद होती. मात्र दुचाकी तसेच पायी घराबाहेर निघून नागरिकांनी संचारबंदीला हरताळ फासला. दरम्यान आज 24 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.

दीपक टॉकीज परिसरात दुपारी 11 ते 12 वाजताच्या सुमारास अनेक चिकन व मटण विक्रेत्यांनी आपली दुकाने सुरू केले. आज रविवारचा दिवस असल्याने नागरिकांनीही गर्दी केली. अखेर तक्रार गेल्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन दुकाने बंद केले. मात्र पोलीस जाताच पुन्हा दुकाने सुरू झाली. अखेर त्यांच्यावर नगरपालिकेने दंड लावल्याची माहिती आहे.

संचारबंदीमुळे नेहमी गजबजणारे आंबेडकर चौक, जटाशंकर चौक, गांधी चौक, टिळक चौक, साई मंदिर चौक इत्यादी ठिकाणी सुनसान होते. तर मुख्य रस्त्यांपासून दूर वार्डाच्या आत असलेले काही छोटे दुकानं सुरू होते. वणीकरांच्या आवडीच्या खर्राची तलब पानटपरीचालकांनी थेट भेटून पूर्ण केली. अनेक चौकात नेहमीच्या ग्राहकांनी ही सेवा देण्यात आली.

कालपासून चर्चेत असलेल्या शहरातील वाईनशॉपवर आजही पार्सल सुविधा उपलब्ध होती. शनिवारी रात्री या वाईन शॉपमधून पार्सल सुविधा सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान आजही संध्याकाळी येथून पार्सल सुविधा सुरू असल्याची माहिती आहे.

आठवडी बाजार बंद असल्याने लहान व्यापाऱ्यांचे नुकसान
रविवार वणीचा बाजाराचा दिवस असल्याने अनेक व्यापारी, शेतकरी हे भाजी विकण्याकरिता वणीच्या बाजारात येत होते. परंतु आज आठवडी बाजार  बंद असल्याने या लहान व्यावसायिकांचे चांगलेच आर्थिक नुकसान झाले. आठवढ्यातून एक दिवस व्यवसाय करून अनेक छोटे व्यापारी आपले घर चालवितात. या व्यापाऱ्यांना बाजार बंदचा चांगलाच फटका बसला.

आज 24 व्यक्तींवर कारवाई
लॉकडाऊनचे नियम तोडणा-यां 24 व्यक्तींवर आज कारवाई करण्यात आली आहे. यातील 9 व्यक्तींवर मास्क न वापरल्याने तर 15 व्यक्तींवर सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने कारवाई करण्यात आली. यात मास्क न लावणा-यांना प्रत्येकी 500 रुपये तर असा 4500 रुपये तर सोशल डिस्टन्सिंग न पाळणा-यां 15 जणांकडून प्रत्येकी 200 रुपये असा 3 हजारांचा दंड आकारण्यात आला. आज नगरपालिकेची दंडाची रक्कम 7500 रुपये होती.

हे देखील वाचा:

ग्रामीण भागात वाढतोय कोरोना, आज 2 पॉजिटिव्ह

रस्ता रुंदीकरणासाठी शंभर वर्ष जुन्या वृक्षांची कत्तल

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.