शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक हाजी हारूण चीनी यांचे निधन

सेवन स्टार उद्योग समुहाचे ते संस्थापक होते

0

विवेक तोटेवार, वणी: परिसरातील सुप्रसिद्ध ब्रँड सेव्हन स्टार या उद्योग समुहाचे संस्थापक हाजी हारूण हाजी जिकर चीनी यांचे आज अल्पशा आजाराने दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. एक यशस्वी उद्योजकासह ते नगिना मस्जिद याचे देखील विश्वस्त होते. शहरातील पहिली बेकरी, पहिली आईसक्रिम फॅक्टरी त्यांनीच सुरू केली. बुधवारी सकाळी 10 वाजता शाम टॉकीज जवळील त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे. ज्येष्ठ पत्रकार फारुक चीनी व जब्बार चीनी यांचे ते वडील होते.

सुमारे 60 वर्षांपूर्वी हाजी हारुण चीनी जिकर चीनी हे लग्नानंतर आपल्या पत्नीसह गुजरातहून वणीत आले. सुरुवातीला त्यांनी इतर व्यवसाय केले. मात्र 1980 च्या दरम्यान ते बेकरीच्या व्यवसायात आले. अतिशय परिश्रम घेऊन त्यांनी या व्यवसायात जम बसवला. पुढे त्यांनी शहरातील पहिली बेकरी सुरू केली. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

शहरात पहिली आईस फॅक्टरी, शहारातील पहिले आईस क्रिम फॅक्टरी, कोल्ड स्टोरेज हे देखील त्यांनीच सुरू केलेत. त्यांच्या सात मुलांवरून त्यांनी त्यांच्या उद्योग समुहाला सेव्हन स्टार हे नाव दिले होते. आज लोकांची विश्वासाहर्ता मिळवलेला एक ब्रँड म्हणून याकडे बघितलं जातं. हा संपूर्ण उद्योगाचा डोलारा त्यांनी संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवत सुरू ठेवला हे विशेष. आज सेव्हन स्टार बेकरी, आईस फॅक्टरी, कोल्ड स्टोरेज, मॉल, रेस्टॉरन्ट, कॅफे यासह अनेक छोट्यामोठ्या क्षेत्रात कार्यरत आहे. 

हाजी हारूण हाजी जिकर चीनी यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रातील एक तारा निवळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. हाजी यांच्या पश्चात पत्नी तसेच 7 मुलं, नातवंड, सुन असा मोठा आप्तपरिवार आहे. हाजी हारुण यांच्यावर बुधवारी सकाळी 10 वाजता शाम टॉकीज जवळील त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे व स्थानिक कब्रस्तानात त्यांच्यावर अंत्यविधी केला जाणार.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.