Exclusive: ट्रॅव्हल्स उलटली नी झाला एकच कल्लोळ, काय म्हणतात प्रत्यक्षदर्शी
ऑटोचालक धावले मदतीला, जखमींना काढले बाहेर
रवि ढुमणे, वणी: चंद्रपूर ते पुणे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस सायंकाळी 7 वाजताचे सुमारास वणीवरून निघाली. गाडी पळसोनी फाट्यावर येताच त्याच वेळेस झरपट येथील भारत वैद्य या मजुराने गाडी फाट्यावरून वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी वळवताना गाडी रस्त्याच्या मध्ये आली. ट्रॅव्हल्सच्या पुढे दुचाकी येताच दुचाकीला वाचवण्यासाठी ट्रॅव्हल्सने गाडी उजव्या बाजुला घेतली. मात्र दोन्ही वाहन वेगात असल्याने ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिली. यातच ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या उजव्या बाजुला जाऊन उलटली. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी वणी बहुगुणीला दिली. या धडकेत दुचाकीस्वार भारत जागीच ठार झाला.
बस उलटल्याने एकच कल्लोळ झाला. बस मधील प्रवासी आत होते. बाहेर निघायचा मार्ग बंद झाला होता. बस पलटी झाल्याचे दिसताच या मार्गाने जाणारी वाहने मजतीसाठी थांबली. यात राजूर कॉलरी येथील ऑटोचालक, आणि रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी आपली वाहने उभी करीत बस मधील प्रवाश्यांना बाहेर काढले. यात बसमधील एका महिलेच्या पायाला जबर दुखापत झाली. तर काहींना किरकोळ मार लागला.
‘हे’ ठरले प्राणदूत..
अपघात झाल्याचे लक्षात येताच सर्व कामे बाजुला सारून
राजूर कॉलरी येथील ऑटोचालक राजू ओझा, मयूर अंडरस्कर, पंकज कांबळे, ओम चिमुरकर, राहुल भगत व इतर लोकांनी प्रवासी बाहेर काढण्यात मदत केली. त्यांना ऑटोत बसवून लगेच वणीच्या ग्रामीण रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संगीता हेलोंडे, पीएसआय जयप्रकाश निर्मल, वाहतूक शाखेचे एपीआय संग्राम ताठे, डीबी पथकाचे सुनील खंडागळे दीपक वांड्रसवार, व वणी मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच लोकांची गर्दी झाली होती.