जेव्हा तिच्या सायकलीला अचानक बिबट्या क्रॉस करतो…

विविध थरारक अनुभवांसह पुनवटची तरुणी करीत आहे हजारो किलोमीटरचा प्रवास

0

निकेश जिलठे, वणी: ‘ती’ सायकले थोड्याशा जंगली भागातून प्रवास करीत होती. अचानक एक बिबट्या तिच्या सायकलसमोरून झर्रकन निघून जातो. तरीही ती घाबरत नाही. एखाद्या वेळी प्रवास करताना कोणत्यातरी आडमार्गाच्या गावातच रात्र होते. रात्री थांबायचं कुठे किंवा पुढचा प्रवास तरी कसा करावा? असे अनेक प्रश्न तिच्या पुढ्यात उभे राहतात. मात्र तरीही न डगमगता तालुक्यातल्या एका छोट्याशा गावातली ही तरुणी हजारों किलोमीटरच्या प्रवासाला चक्क सायकलने निघते. या प्रवासातील तिचे अनुभव थरारक आहेत. अंगावर काटा आणणारे आहेत.

महिला जरी शहरात दुचाकीने प्रवास करीत असल्या तरी बाहेरगावी दुचाकीने प्रवास करणे ही गोष्ट महिलांच्या बाबतीत जवळपास अशक्यच मानली जाते. मात्र दुचाकी ऐवजी सायकलने एखादी तरुणी प्रवास करत असेल आणि ते ही थोडा थोडका नाही तर तब्बल 8 हजार किलोमीटरचा प्रवास करत असेल तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. मात्र ही किमया साध्य केली आहे आपल्याच परिसरातील एक तरुणीने. पर्यावरण वाचवण्याचा संदेश घेऊन जनजागृती करत या 21 वर्षीय तरुणीचा सध्या सायकलने महाराष्ट्रभर प्रवास सुरू आहे. या तरुणीचे नाव आहे प्रणाली विठ्ठल चिकटे. ती आपल्याच तालुक्यातील पुनवट या गावातील रहिवाशी आहे. सध्या तिचा प्रवास कोकणातल्या दापोली तालुक्यात पोहोचलाय.

कुणी भटकंती, तर कुणी नवनवीन ठिकाणं एक्सप्लोअर करण्यासाठी तर कुणी निखळ आनंद मिळण्यासाठी प्रवास करतात. मात्र प्रणालीचा हा सायकल प्रवासाचा उद्देश केवळ भटकंतीसाठी नाही तर त्यातून एक सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेऊन केलेला आहे. प्रणाली ही पर्यावरण कार्यकर्ती म्हणून काम करते. पर्यावरणाच्या संवर्धनाचा संदेश घेऊन ती सायकलने जनजागृती करत फिरते. रस्त्यात जे गाव येईल तिथे पर्यावरणासंबंधी स्थानिकांना माहिती द्यायची. प्रदूषण, प्लास्टिक कचरा निर्मूलन, स्वच्छता इत्यादी बाबत जनजागृती करायची, या अभियानात आणखी पर्यावरणप्रेमींना जोडायचे आणि पुढे निघायचे. असा मोठं ध्येय असलेला आणि क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा असाच प्रणालीचा प्रवास आहे.

प्रणाली ही एका सर्वसामान्य कुटुंबातून आली आहे. तिचे वडील विठ्ठलराव चिकटे हे पुनवट येथे शेती करतात. प्रणालीचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. त्यानंतर तिने 11 वी सायंससाठी चंद्रपूर येथे प्रवेश घेतला. 12 वी नंतर तिने सुशीलाबाई रामचंद्र मालेगाव, पडोली इथून सोशल वर्कची (बीएसडब्ल्यू) पदवी घेतली. सध्या ती वर्धा येथील सुप्रसिद्ध हिंदी विद्यापीठातून पीजी डिप्लोमा करीत आहे. याशिवाय यशदाचे प्रशिक्षण देखील तिने पूर्ण केले आहे. यशदाच्या जलसाक्षरता अभियानासाठी ती जलदूत म्हणूनही काम करते.

पर्यावरण क्षेत्रात काम करतानाच प्रणालीच्या मनात एकाद्या राज्यस्तरिय अभियानांतर्गत जनजागृती करण्याचा विचार आला. यासाठी तिने सायकलची निवड केली. तसेही तिला लहाणपणापासून सायकल चालवण्याची आवड होती. शिवाय सायकल हे एक स्वस्त आणि प्रदूषण विरहित साधन आहे. मात्र सायकलने संपूर्ण राज्य प्रवास करणे ही काही छोटी बाब नव्हती. रोजच्या प्रवासाचा स्टॅमिना, संपूर्ण राज्यभर प्रवास म्हणजे खर्च ही आला. मात्र प्रणालीचा निश्चय दृढ होता. सायकलने प्रवास करण्याचा सराव व्हावा म्हणून प्रणालीने दारोदारी सायकलने पेपर टाकले. त्यातून सराव तर झाला शिवाय त्यातून तिची थोडीबहुत आर्थिक तडजोड देखील झाली. पुढे दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजी खिशात अवघे 500 रुपये, थोडेबहुत साहित्य व सायकल घेऊन प्रणालीच्या प्रवासाला सुरुवात झाली.

6 महिन्यात 8 हजार किलोमीटरचा प्रवास
पुनवट, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, काटोल, अमरावती, नंदूरबार, धुळे, मालेगाव, नाशिक, इगतपुरी, शहापूर, जव्हार, वाडा, तलासरी, डहाणू, पालघर, पनवेल दापोली, मानगाव हे ठिकाणे करत सध्या प्रणाली कोकणातल्या चिखलगाव येथे पोहोचलीये. कोरोना, लॉकडाऊन इत्यादी अडचणीवर मात करीत 6 महिन्यात प्रणालीने 8 हजार किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास केला. पावसाळा सुरु होण्याच्या आधी तिला कोंकणमधून बाहेर पडायचे आहे. त्यानंतर ती कोल्हापूरला येऊन तिथून पुणे येथे जाणार आहे. त्यानंतर पुढची दिशा ती ठरवणार आहे.

इच्छा तिथे मार्ग
हा 8 हजार किलोमीटरचा प्रवास असा सहज झाला असे नाही. यासाठी तिला अनेक कठिण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी राहण्याची समस्या आली. प्रवासाच्या सुरूवातीच्या काळातच रामटेकला जातानाचा प्रवास तर एक वेगळा अनुभव देऊन गेला. रामटेक हे डोंगरावर असलेले ठिकाण आहे. पहिल्यांदाच या ठिकाणी जात असल्याने याची तिला कल्पना नव्हती. सिंगरदीप गावावरून जाताना डोंगराळ रस्त्या असल्याने अपेक्षीत अंतर पार झाले नाही. जाताना अंधार पडला. उशिरा पोहोचल्याने तिथे राहण्याची कोणतीही व्यवस्था करता आली नाही. तिने राहण्यासाठी अनेकांना मदत मागितली. मात्र कोरोनामुळे राहण्यासाठी प्रत्येक ठिकाणाहून तिला नकार मिळत होता. अखेर दोन तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर एका नगरसेविकेतर्फे तिची व्यवस्था एका धर्मशाळेत करण्यात आली.

खिशात अवघे पाचशे रुपये घेऊन पुनवटपासून सुरू केलेला प्रणालीचा प्रवास आता थेट कोकणात पोहोचला आहे. अगदी मोजक्या पैशात राज्यभर प्रवास करणे आणि तेही मोठ्या काळासाठी हे एक जिकरीचेच काम आहे. 29 डिसेंबरला प्रणालीच्या वाढदिवसाला तिने लोकांना झाडे लावण्याचे आवाहन केले. काहींनी झाडे लावले तर काहींनी गिफ्ट पाठवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र गिफ्ट नाकारत तिने अभियानासाठी मदतीचे आवाहन केले. तिच्या मित्र मैत्रिणींनी 10 हजार गोळा करत तिला बर्थडे गिफ्ट दिले. त्यावरच तिचा हा प्रवास सुरू आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते प्रणालीची राहण्याची व्यवस्था करतात. नाहीच जागा मिळाली तर मंदिर, धर्मशाळा इत्यादी ठिकाणी ती मुक्काम करते. अडचणी तर येतच राहतात मात्र तिचा प्रवास, कार्य थांबलेले नाही.

जेव्हा अचानक समोरून बिबट्या जातो…
सायकलचा प्रवास दरवेळी हायवेने असतोच असे नाही. अनेकदा जंगलातूनच वाट काढून रस्ते तयार केलेले असतात. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून जव्हारला जातानाची वाट ही अभयारण्याची आहे. तानसा अभयारण्याचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी प्रणालीने थोडा आडमार्गच निवडला. दरम्यान सुनसान रस्त्याने जाताना निलगाईच्या मागे शिकारीसाठी लागलेला एक बिबट्या अचानक तिच्या सायकलसमोरून झर्रकन निघून गेला. हा प्रसंग अंगावर काटा आणणारा होता. विशेष म्हणजे यावेळी ती चढावावरून सायकलने जात होता. मात्र प्रसंगवधान लक्षात घेऊन तिथून ती लवकर बाहेर पडली. याशिवाय प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात प्रणाली गोंदिया जिल्ह्यातून जाताना एका ठिकाणी नकळत तिच्या सायकल खाली काहीतरी नरम वस्तू जाणवली. तिने उतरून खाली बघितले असता तिच्या सायकलच्या चाकाखाली एक अजगर आला होता. 

या प्रवासात अनेकदा सायकल खराब होते. कधी चाक पंक्चर होते. आता छोटे मोठे काम ती स्वत:च शिकली आहे. मध्ये एकदा अचानक सायकलची चैन तुटली असता तिच्या जवळ असलेल्या टुलकीटच्या मदतीने तिने स्वत:च ती जोडली. प्रवासात अनेक सायक्लिस्ट लोकांची भेट होते. त्यांनी एकदा तिची सायकल सर्विसिंग करून दिली. सततच्या प्रवासाने सायकलचा टायर संपूर्ण झिजला होता. तेव्हा वसईच्या एक सायक्लिस्ट गृपने तिला टायर टाकून दिला. अशा छोट्या मोठ्या अडचणी कायमच येत असतात.

या प्रवासात तिला अनेक विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणा-या व्यक्ती भेटल्या. त्यांची कार्यपद्धती ती समजून घेते. त्यांच्याकडून ती शिकत राहते. सोबतच अनेक लोक तिच्यापासूनही प्रेरणा घेतात. तिच्या कार्याचा कार्यामुळे केवळ पर्यावरणचाच नाही तर महिला सक्षमीकरणाचा संदेशही जातो. भविष्यात जल, जंगल व जमीन यासाठीच तिला काम करायचे आहे. शिवाय पर्यावरण क्षेत्रालाच एक प्रोफेशन म्हणून निवडायचं आहे. हा प्रवास जरी जिकरीचा असला तरी त्यापासून मिळणारा अनुभव हा तिच्यासाठी सुखद आहे. या प्रवासात मिळालेले विविध अनुभव पुस्तकरूपात प्रकाशित करण्याचा तिचा मानस आहे. तिच्या या अभियानात आपणही सहभागी होऊ शकता, तिचे अभियान पुढे अविरत सुरु राहण्यासाठी आपण तिला मदत करू शकता. आपल्या परिसरातील या जिगरबाज लेकीला ‘वणी बहुगुणी’तर्फे खूप खूप शुभेच्छा…

Leave A Reply

Your email address will not be published.