सालेभट्टी येथील सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामातही गैरप्रकार
ठेकेदाराने स्वच्छ भारत अभियानाचा उडवला फज्जा, पाणी टाकी, नळ फिटिंग, शोषखड्डयाचे काम न करता उचलले बिल
जितेंद्र कोठारी, वणी: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सालेभट्टी येथे बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण न करता कामाचे संपूर्ण बिल कंत्राटदारांला देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पाण्याची टाकी, नळ फिटिंग व मल निस्सारण शोष खड्याचे कामे बाकी असताना काम पूर्ण झाल्याचे दाखवून कामाची रक्कम देण्यात आली. विशेष म्हणजे सालेभट्टी येथील नागरिकांनी ठक्कर बाप्पा योजनेतील कामे याच ठेकेदाराला देण्याचा घाट उधळून लावत याविरोधात तक्रार दिली होती.
मारेगाव पंचायत समितीमधील सालेभट्टी गट ग्राम पंचायत येथे वर्ष 2019-20 मध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सार्वजनिक शौचालयासाठी 2 लाखाची निधी मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्याचे नातलग असलेल्या एका कंत्राटदाराला शौचालय बांधण्याचे काम देण्यात आले. मात्र सदर ठेकेदारांनी महिला पुरुष शौचालयाचे बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्ज्याचे केले. तसेच पूर्ण काम न करताच कामाचे संपूर्ण देयके उचलण्याची माहिती आहे. मारेगाव पंचायत समिती अंतर्गत सिमेंट रोड शौचालय, नाली बांधकाम, ग्राम सौंदर्यीकरण व इतर कामाचे कंत्राटही या कंत्राटदाराने आपल्या “पारखी’ नजरेतून सुटू दिले नाही. निकृष्ट दर्जाचे काम वारंवार करूनही परत कामे मिळवण्यात या ठेकेदारांनी ‘प्रोफेसर’ची डिग्री मिळविली आहे.
राजकीय बेकग्राऊंड असलेले कंत्राटदाराला ग्राम पंचायत कारकून व संबंधित विभागाचे अधिकाऱ्याचे सहभाग लाभत असल्याने तो कुणालाही जुमानत नसल्याची ओरड सालेभट्टी येथील नागरिक करीत आहे. वरुड गट ग्राम पंचायतीचे तात्कालीन ग्रामसेवक विनोद तोडासे यांनी सार्वजनिक शौचालयाच्या कामाचे 1 लाख 20 हजाराचे देयके कंत्राटदाराला प्रदान केल्याची माहिती दिली. सालेभट्टी येथील सार्वजनिक शौचालय बांधकामाचे उर्वरित देयके कोणी काढले या बाबत वर्तमान ग्रामसेवक, गट विकास अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांनी अनभिज्ञता दर्शविली.
कामाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे: बीडीओ
वरुड गट ग्राम पंचायत अंतर्गत सालेभट्टी येथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत निर्मित सार्वजनिक शौचालय बांधकामाची व इतर कामाची चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. काम पूर्ण न करता ठेकेदाराला रक्कम देणाऱ्या दोषी व्यक्तीवर कार्यवाही करण्यात येईल.
– गट विकास अधिकारी, पं.स. मारेगाव
हे देखील वाचलंत का?
सालेभट्टी प्रकरणात तक्रारदारांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न