चिचपल्लीवाले काकांच्या मातीचा गंध असलेल्या स्वयंपाकाची धमाल
मातीच्या भाड्यातील व चुलीवरच्या नॉनवेजची अस्सल गावरान चव वणीकरांसाठी
निकेश जिलठे, वणी: शहरात घरोघरी आता मातीच्या चुली राहिल्या कुठे? त्यातही मातींच्या चुलींवरती बनवलेल्या भाकरी आणि खमंग नॉनवेजचा गंध हवाहवासा वाटतो. ही मजा खेड्यात आजही येते. पण हे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खेड्यात जायचे, बनवणारा शोधायचा म्हणजे पूर्ण दिवसाचं श्रमच. पण आता हे झाले अगदी सोप्पे, अस्सल मातीचा गंध असलेला स्वयंपाक तोही आपल्या वणी शहरात. आपल्या आवडीनुसार रसिकतेने बनवून देणारा ‘वस्ताद’ वणीतील लॉर्ड्स रेस्टॉरंटमध्ये आला असून सध्या चांगलाच प्रसिद्ध होतोय.
मातीचे भांडे, त्यात तेलाचा हलका तवंग, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटावं असा त्याचा रंग आणि सुवास. एक घास तोंडात टाकताच वाह अशी आपसुकच दाद निघते. ही करामत आहे चिचपल्लीवाल्या काकांची… परिवाराला मित्रांना पाहुण्यांना काहीतरी नवीन आणि झक्कास खायला द्यायचं म्हटलं की आज वणी शहरात पहिलं नाव येतं ते चिचपल्लीवाल्या काकांचं. कॉलेज रोडवरील लॉर्ड्स रेस्टॉरंटमध्ये चिचपल्लीवाल्या काकांचे रसिक खवय्ये अगदी वेटिंगवर असतात.
काही व्यक्ती खवय्ये असतात. तर काहींना खिलवण्याचा शौक असतो. चिचपल्लीवाले काका यांना खिलवण्याचा शौक आहे. आपण अनेकदा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नॉनवेज खात असतो पण आता आपल्यालाही प्रश्न पडला असेल की असं यात वेगळं काय आहे, तर अप्रतिम चव हिच त्यांच्या नॉनवेजची खासियत. सर्व नॉनवेज हे मातीच्या भांड्यात बनतात. तेलाचं प्रमाणही अगदी जितकं गरजेचं आहे तितकंच. कुठेही तेलाचा अतिरेक नाही. कांदा आणि टॉमॅटोचं अगदी कमी प्रमाण. चिकन आणि मटनाची जी ओरीजनल चव आहे तीच चव खवय्यांना मिळावी हा यामागचा उद्देश. अनेकदा मसाल्यांचा भडीमार झाल्याने खवय्यांना मिळणारी नॉनवेजची ओरीजनल चव कुठेतरी विसरली जाते.
बनवण्याची पद्धती काहीशी वेगळी आहे. एका किलोसाठी केवळ एक छोटा चमचा सिक्रेट मसाला टाकला जातो. जो नॉनवेज डिशला एक वेगळी चव देतो आणि त्याला आवश्यक तो घट्टपणाही आणतो. यात महत्त्वाचं म्हणजे केवळ मिठ आणि तेल हे दोन घटक सोडले तर बाकी सर्व मसाले ते स्वतः घरीच तयार करतात. यात वारण्यात येणारं तेल हे फल्ली असते. त्यामुळे फल्ली तेलाची चव नॉनवेजची गोडी वाढवते. शिजवण्यासाठी मातीच्या भांड्यावर जाळ असतो तो चुलीचा. चुलीच्या आचेवर सुमारे दीड तास नॉनवेज शिजल्यावर त्याचा संपूर्ण उतरलेला कस त्या डीश मध्ये उतरतो. त्यामुळे लॉर्ड्स रेस्टॉरंटमध्ये त्यांनी बनवलेले नॉनवेज हे इतर ठिकाणी बनणा-या नॉनव्हेजपेक्षा वेगळे ठरते.
ही तयार झालेली डिश एकदा जो खवय्या खातो. तो ती संपत पर्यंत केवळ बोटे चोखत असतो. खाताना काही कमी जास्त झालं का याची आपुलकीने चौकशी ही सुरू असते. अंगात कितीही थकवा असो. तेवढ्याच उर्जेने आणि प्रेमाणे ते खवय्यांना खिलवणार, हे कलंदर व्यक्तिमत्व आणि यांना शोधून काढलं ते लॉर्ड्स रेस्टॉरंटचे संचालक मोरेश्वर उज्ज्वलकर यांनी..
कोण आहेत हे चिचपल्लीवाले काका?
चिचपल्ली हे चंद्रपूर जिल्ह्यातलं एक छोटसं गाव. तर चिचपल्लीवाले काका म्हणून प्रसिद्ध असलेल्या या काकांचं नाव रत्नाकर धानकुटे असं आहे. बी. कॉम, बीए पोलिटिकल सायंस सोबतच मार्केटिंग मॅनेजमेंटचा डिप्लोमा. पण नोकरीत मन लागलं नाही त्यामुळे 1991 मध्ये ते रेस्टॉरंटच्या व्यवसायात उतरले. अजयपूर या चंद्रपूर मुल मार्गावर अंधारी नदीच्या काठी त्यांनी त्यांचं रेस्टॉरंट टाकलं. अंधारी रेस्टॉरंट या त्यांच्या नदीकाठच्या धाब्याने त्यांना चंद्रपूर जिल्ह्यात ओळख दिली. मोठ मोठे ऑफिसर, चंद्रपुरातील खवय्ये व्यक्ती चंद्रपूरहून खास त्यांच्या हातचे नॉनवेज खाण्यासाठी तिथं जायचे. नदीकाठच्या परिसरात मातीच्या भांड्यात आणि चुलीवर बनवलेल्या चिकन मटनला चंद्रपूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. मुळचे ते चिचपल्लीचे त्यामुळे त्यांची चिचपल्लीवाले काका अशी ओळख बनली.
2011 मध्ये त्यांनी ते रेस्टॉरंटमधून बाहेर पडेल आणि त्याचा सर्व कारभार त्यांनी मुलाकडे दिला. त्यानंतर त्यांनी काही नागपूर, राजुरा इत्यादी ठिकाणी रेस्टॉरंट काढण्याचा प्रयत्न केला पण काही कारणास्तव ते तिथे रमले नाही. पुढे जिवनात अशा काही घटना घडल्या की त्यांना 2015 मध्ये त्यांना घरदार सोडावं लागलं. तेव्हापासून ते कधीच घरी गेले नाही.
लॉर्ड्स रेस्टॉरंटचे संचालक मोरेश्वर उज्ज्वलकर हे स्वतः एक पट्टीचे खवय्ये. अजयपुरच्या धाब्यावर ते अध्येमध्ये जेवायला जायचे. त्यांची प्रेमाणे खाऊ घालण्याची पद्धत, नेहमी वेगवेगळे प्रयोग हे त्यांनी डोळ्याने बघितले होते. ‘बंदे मे कुच दम है’ हे ते जाणून होते. पुढे जून-जुलै महिन्यात त्यांनी रेस्टॉरंटकडे लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना अचानक चिचपल्लीवाले काका आठवले, लगेच त्यांनी त्यांना फोन केला. आणि एका पट्टीच्या खवय्याचं बोलावणं येताच काका क्षणाचाही विलंब न करता वणीत हजर झाले.
आज लॉर्ड्स रेस्टॉरंटमध्ये मातीच्या हंडीत बनवलेले सुखा चिकन -मटन, ग्रेवी चिकन-मटन आणि फ्राय चिकन-मटन हे त्यांच्या काही खास डिशेस, सोबत खूर आणि मुंडीही त्यांची डिश प्रसिद्ध आहे. महत्त्वाचं म्हणजे काका स्वतः वेज आहे. पण नॉनव्हेज खाणा-यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तितक्याच हौशीने ते नॉनवेज डिश बनवतात. वेज खाणा-यासाठीही इथे बरेच काही आहे. मसाला वांगे, मसाला बटाटा, फणस पाटवडी या वेज डिशही ते खास वेज ग्राहकांसाठी तयार करतात.
ज्यांचे पती जेव्हा रात्री घरी जेवण करत नाही तेव्हा पत्नीने समजून घ्यायचं की ते आज चिचपल्लीवाल्या काकांच्या हातचे नॉनवेज खात असावे. त्यामुळे पत्नीनेही त्यांच्या पतीकडे पार्सलची मागणी नक्कीच करावी. आज चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात चिचपल्लीवाल्या काकांचं नाव सर्व चवीने खाणा-यांच्या ओठावर आहे. चिचपल्लीवाल्या काकांच्या हातचा चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे एक अपूर्व मेजवानीच असते. ही चव जर तुम्ही चाखली नसेल तर तुम्ही खरे खवय्येच नाही असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे एकदा तरी चवीने खाणा-याने एकदा तरी चिचपल्लीवाल्या काकांच्या हातची चव चाखायला एलटी कॉलेज रोडवरील लॉर्ड्स रेस्टॉरंटला भेट द्यायलाच हवी.