पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील सुपरिचित कवयित्री, लेखिका मिनाक्षी गोरंटीवार लिखीत “वेलू” या ललित लेख संग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच जागतिक कीर्तीचे थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील जोडो भारत सभागृहात झाला. अत्यंत साध्या पद्धतीने झालेल्या या कौटुंबिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बाबांचे जेष्ठ पुत्र तथा महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ.विकास आमटे होते.
यावेळी व्यासपीठावर डॉ.भारती आमटे, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त कौस्तुभ आमटे, सुधाकर कडू, डॉ.विजय पोळ, पल्लवी आमटे, विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथील वाणिज्य भाषा विभागप्रमुख डॉ. यशवंत घुमे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलतांना डॉ.आमटे म्हणाले ” मिनाक्षी गोरंटीवार या उदयोन्मुख लेखिका आहेत. त्यांनी यापूर्वी उत्कृष्ट लेखिकेचा स्वयंसिद्धा हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केला असून सातत्याने तरूण भारत, लोकशाही वार्ता, देशोन्नती, पुण्यनगरी, लोकमत इत्यादी विविध वृत्तपत्रांतून प्रासंगिक व ललित लेखन केले आहे.
वेलू हा ललित लेखसंग्रह मरगळलेल्या मनाला प्रसन्नता देण्याचं काम करणारं आहे. या पुस्तकातील सारेच लेख भावनांना स्पर्श करणारे आहेत. अशा भावना व्यक्त करीत गोरंटीवार यांच्या लेखणीतून मानवतावादी लेखन घडो अशी सदिच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन ममता गुंडावार, प्रास्ताविक प्रसन्न गोरंटीवार, आभारप्रदर्शन ओंकार गुंडावार यांनी केले.