परिसरात कोळसा तस्करीला उधाण, पोलीस, वेकोलीचे पाठबळ ?
रोज लाखो रूपयांच्या कोळशाची तस्करी, रात्रभर वाहनांची रेलचेल
रवि ढुमणे, वणी: गेल्या काही दिवसांपासून वेकोलितून कोळसा चोरीला जोमदार सुरूवात झाली आहे. रात्रभर कोळशांची वाहने ब्राम्हणी मार्ग ते लालपुलीया परिसरात रेलचेल करीत आहे. परिणामी वेकोलिला दरडोई लाखो रूपयांचा फटका बसत आहे. हा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने या प्रकाराला वेकोलि व पोलीस प्रषासनाचे अर्थपूर्ण पाठबळ तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गंभीर प्रकाराकडे शासन लक्ष पुरविणार का, असा सवाल विचारला जात आहे.
वणी उत्तर क्षेत्रात येणा-या वेकोलिच्या कोळसा खाणीतून मोठ्या प्रमाणात कोळसा तस्करी सुरू झाली आहे. या कोळसा तस्करीला वेकोलिच्या अधिका-यांचे मोठ्या प्रमाणात पाठबळ आहे. डंपींग, काटाघर आणि शेवटचा टप्पा म्हणजे वेकोलिची सुरक्षा चौकी हे तीनही ठिकाणे पार करताना वेकोलिचे कर्मचारी व फिल्ड अधिकारी जातात तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्तर क्षेत्रात येणा-या खाणीतील अधिकारी हे कोळसा तस्करांशी हातमिळवणी करत असल्याने वेकोलिच्या खाणीतून मोठ्या प्रमाणात खनिजाची चोरी होताना दिसत आहे.
सध्या ब्राह्मणी मार्गे रात्रभर पिकअप, ट्रक्टर सारख्या वाहनातून कोळसा तस्करी सुरू करण्यात आली आहे. रात्री पासून सुरू होणारी ही कोळशाची तस्करी सकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असते. सदर वाहने वेकोलि ते लालपुलीया मार्गे कोळसा भरून येताना दिसत आहे. सीसीटीव्ही यंत्रणा साठी अद्ययावत यंत्रणा असूनही सुरक्षा अधिकारी मूग गिळून गप्प आहे.
कोळसा तस्करांना पोलिसांचे पाठबळ ?
तस्करांना वेकोलिचे अधिकारी पाठबळ देत असल्याने पोलिसांची चांगलीच चांदी झाली आहे. सुव्यवस्थेचा दिंडोरा पिटवून पोलिसांकडून कोळसा तस्करीला पाठबळच मिळत आहे. एखाद्या वाहनावर कारवाई करून वाहन चालकावर कारवाई करणे आणि कोळसा तस्कराला मोकाट ठेवणे इतकी सुविधा मात्र तस्करांना मोकळी करून दिली असल्याचे दिसत आहे. कोळसा तस्करीत असणारे बडे मासे अद्याप पडद्याआड आहेत. ठाण्यातील प्रत्येक युनिटच्या ते संपर्कात आहेत. परिणामी त्यांना पाठबळच मिळत आहे.
वेकोलितील कोळसा कळमणा रोड आणि रामदेव बाबा मंदीर कडे
वेकोलितून चोरी करून आणलेला कोळसा सध्या कळमना रस्त्यावरील एका कोळषाच्या प्लॉटवर उतरविण्यात येत आहे. पुर्वी पोलिसांचा खब-या आणि वाहतूक विभागाची वसूली करणारा अण्णाच या तस्करीत गुंतला आहे. सोबतच मागील काही वर्षांपूर्वी मटका व्यवसायात असलेले सुध्दा आता या कोळसा तस्करीच्या व्यवसायात आले आहेत.
(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400 )