बहुगुणीकट्टा: द्वैतातून अद्वैताचा प्रवास… प्रेम !

0
बहुगुणीकट्टामध्ये आजचे आर्टिकल आहे सुनील इंदुवामन ठाकरे यांचे
द्वैतातून अद्वैताचा प्रवास… प्रेम !
नक्षत्रभारल्या डोळ्यांतून पाझरताना जो गंध येतो तो फक्त प्रेमाचाच असतो. एका स्मिताने मनाची तार छेडावी आणि प्रीतीचे अनादी सूर दरवळायला लागावेत असंच असतं प्रेम. जागत्या गर्द रात्रीत रंगीत स्वप्नांची झालर पापण्यांना अधिक तलम करते. झाकल्या डोळ्यांतून पापण्याआड दडलेली अक्षरं न् अक्षरं स्पष्ट दिसायला लागतात. ओठांचं गुंजन चिरंजीव नसतंच कधी, डोळ्यांच्या आतील नाद अनंत असतो. हा नाद ऐकायचा, पाहायचा की अनुभवायचा हे कळण्याच्या आतच आपण कधीकधी स्वतःच हा नाद होत जातो. हेच असतं प्रेम. क्षणांच्या नाजूक मखमलीवरती आठवांच्या कोरीव नक्षी उठून दिसतात. छिन्नीने मनाचा व्यावहारिक पाषाण छिलताना, त्याचे कितीतरी हवे हवे असलेले पापुद्रे गळतात. काही नकोशा आवरणांमधून मुक्त होताना आपण पिसांसारखे हलके हलके होत जातो. त्याच पिसांवरती जेव्हा स्पर्शाचे रंग चढतात ते थुईथुई रानभर, मनभर नाचायला लागतात. बुबुळाच्या रिंगणात खेळता खेळता त्यावरून आपला तोल सांभाळत जाताना मोठी कसरत होते जिवाची. या बुबुळावरून पाय घसरला तर मग पे्रमाच्या गुलाबी डोहात आपोआप पडतो जीव. जीव बुडत असतो. ते बुडणेही हवेहवेसे वाटते. ते मरणेही हवेहवेसे वाटते. ती एक अवस्थाच असते समाधीची. आत्माचा परमात्माशी होणारा साक्षात्कार अनुभवता येतो.
श्वास आता वाऱ्याचे देहात येणे जाणे नसते. हा श्वास सहवासाचे रंगीत भास शोषून घेतो. कोरड्या तापलेल्या जमिनीवर पावसाची पहिली सर यावी तशीच एकजीव होते मिठी. जमिनीलाही हवी हसते त्या सरींची मिठी. दोघांचेही मूळ अस्तित्त्व एकमेकांत विलीन होते. दोघेही असतात आणि दोघेही नसतात. उरतो फक्त गंध. मिठीला रंग असतो. मिठीला गंध असतो. कवितेसारखा मिठीला छंदही असतो. मिश्र रागांची मैफल सजावी अशी मनाची अवस्था होते. गूढ कवितेसारखा एका अर्थाला शोधता शोधता दुसऱ्याच अर्थाच्या प्रांतात कुठेतरी प्रवास सुरू होतो. हा प्रवास सुरूच असतो. याचा आरंभही कळत नाही आणि अंतही. साधन हे कधी साध्य होतं, तर साध्य कधी साधन होतं. नाजूक वेल एका झाडाला बिलगते. ती पुढे चालून त्या झाडातच रुजायला लागते. प्रेमाच असंच रुजणं असतं. द्वैतातून अद्वैताकडची वाटचाल केवळ आध्यात्मातच होत नाही. दोन जीव एक होतात तीच अवस्था असते अद्वैताची.
इच्छा आणि वासनांच्या पलीकडे जे काही उरतं ते असतं प्रेम. हवंय आणि नकोय याच्या सीमारेषा धूसर होतात. एखादं लहान मूल उगाच खुदकन् हसतं. कधी कधी उगाच रडायला लागतं. त्याचा विवेक वगैरे तपासण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. त्याला आपण हृदयाशीच कवटाळतो. प्रेम ही लहान लेकरासारखीच प्रगल्भ अवस्था आहे. भौतिकतेची कोणत्याच बंधनात अडकत नाही. स्थितप्रज्ञासारखा तो केवळ फक्त बघत असतो. प्रेमातही असंच होतं. कधी कधी मन उगाच भरून येतं. हमसून हमसून दुसरा खांदा ओला होतो. हुंदकेच हुंदके चालत राहतात. ताणलेला तीर बोटांच्या चिमटून सुटायचा अवकाश. तशाच या भावना आतून सुसाट वेगाने निघतात. यातून निघणारा तीर काळीज चिरत जातो. ज्याने सोडला त्याचेही आणि ज्याच्यावर सोडला त्याचेही.
देहाच्या ओढीची सगुणता मनोमिलनाच्या निगुर्णतेकडे जाण्याचं साधन. ओठांची लाली गालांवर पसरते. संपूर्ण देहच गुलाबाचा ताटवा होतो. या प्रेमाच्या स्पर्धेत कधी कधी अहंकाराचे काटेही बोचायला लागतात. मरणाला बिलगण्याची चढाओढ सुरू होते. सांज क्षितिजावरून उल्हासाने यावी आणि क्षीण दिवसाने पाठमोरे गलितगात्र होऊन निघून जावे तसा असतो विरह. क्षितिजावरच भेटायचं असं त्यांचं नेहमीच ठरलेलं असतं. धरती आणि आभाळ भेटतात अगदी तसेच. सगळ्यांचीच मोजमापं सारखी नसतात. आपल्याच परिघासह तिला इतरही परिघांना भेदायचं असतं. किती धावपळ होते तिची. तिचा केंद्रबिंदू, तिचं वर्तुळ संस्कारांनी, परंपरांनी बांधलेलं. आतल्या आत आपल्यांना जपत ती फिरत असते. विश्वाच्या व्यवहाराचे ठोकताळे सांभाळत तिला त्याही भोवती फिरायचं असतं. हा मात्र आकाश असल्यामुळे याला या खटाटोपी कराव्या लागत नाहीत. पण याचे आतल्या आतील परिवलन भावनांचे चक्रीवादळच. त्याचेही धुमसणे व तिचेही धुमसणे. परिभ्रमण म्हणजे केवळ भासच ठरतात. ज्या बिंदूवर ही धरती आणि आकाश संपूर्ण खगोलशास्त्रांच्या विरोधात जाऊन एकमेकांत विलीन होऊन घडीभर विसावतात, तो बिंदूच म्हणजेच प्रेम…
-सुनील इंदुवामन ठाकरे
8623053787
++++++++++++वणी बहुगुणी या न्यूज पोर्टलसाठी आर्टिकल, कविता पाठवण्यासाठी, तसंच तुमच्यात असणा-या कलागुणांविषयी माहिती देण्यासाठी

संपर्क : निकेश: 9096133400

Email id: [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.