भामट्याने वृद्ध महिलेला गंडवले, दागिने घेऊन पसार

पूजा करण्याची बतावणी करून 60 हजारांचे दागिने लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: श्रद्धेचा फायदा घेत एका भामट्याने एका वृद्ध महिलेला गंडवले व दागिने घेऊन पसार झाला. शनिवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास शहरातील राम मंदिर येथे ही घटना घडली. सुमारे 60 हजारांचा मुद्देमाल भामट्याने लंपास केला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील एचडीएफसी बँकेजवळ राम मंदिर आहे. मंदिरासमोरच सुनंदा अरविंद वैद्य (75) राहतात. सुनंदा वैद्य या रोज घरासमोरील राम मंदिरात पूजा करण्यासाठी जातात. शनिवारी सकाळी त्या एका महिलेसह पूजा करण्यास केल्या. त्यांची पूजा सुरु असताना पांढरे कपडे घालून एक भामटा तिथे पोहोचला.

भामट्याने वृद्ध महिलेला दुकानाचे उद्घाटन असल्याची बतावणी करत 1100 रुपये पुजेच्या थालीत ठेवले व त्यांच्या वतीने पूजा करण्याची विनंती केली. पुजेत सोन्याचे दागिने असल्यास कृपा होईल व दुकान चांगले चालेल असे सांगून त्या भामट्याने सुनंदा यांना पूजेच्या थालीत त्यांचे दागिने ठेवायला सांगितले.

त्या भामट्याच्या बोलण्यात येत सुनंदा यांनी बोटातील अंगठी काढली. मात्र त्या अंगठी चालत नाही, सोन्याची बांगडी ठेवा असे सांगितले. सुनंदा यांनी एक बांगडी ठेवली असता त्यांना दोन्ही बांगड्या ठेवण्यास सांगितल्या. त्यानंतर भामट्याने गळ्यातील सोन्याची चैनही ठेवण्यास सांगितली. 1100 रुपये व 2 बांगड्या व सोन्याची चेन हे साहित्य त्या भामट्याने एका रुमालात ठेवले व रुमाल देवापुढे ठेवण्यास सांगितला.

पूजा झाल्यावर रुमाल उघडाल असे सांगून तो भामटा मंदिरातून निघून गेला. पूजा संपल्यावर 10 मिनिटांनी सुनंदा यांनी रुमाल उघडून बघितला असता. त्यात 1100 रुपयेही नव्हते व त्यांचे सोन्याचे दागिनेही नव्हते. दागिने ठेवताना हात चलाखी करून त्या भामट्याने तिथले दागिने आणि पैसे काढून घेतले होते. महिलेने तातडीने घरी येऊन ही घटना आपल्या मुलाला सांगितली. संध्याकाळी या प्रकरणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार देण्यात आली.

या प्रकरणी भामट्याने 2 सोन्याच्या बांगड्या ज्याची किंमत 37 हजार 500 रुपये व सोन्याची चेन ज्याची किंमत 22 हजार 500 रुपये असे एकूण 60 हजारांचे दागिने लंपास केले. सुनंदा अरविंद वैद्य यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या भामट्याचा शोध घेत आहे.

हे देखील वाचा:

धक्कादायक: वणीतील बहुतांश दवाखान्यात आग प्रतिबंधक यंत्रणाच नाही

अपघात: रसोया प्रोटिन्समध्ये 50 फुट उंचीवरून पडले कामगार

Comments are closed.