ज्येष्ठ पत्रकार जब्बार चिनी यांनी लिहिलं मंत्री हंसराज अहिर यांना खुलं पत्र
सर्वसामान्यांच्या मनाला फोडली वाचा
वणी: वणीतील ज्येष्ठ पत्रकार आणि दर्पन पत्रकार वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष जब्बार चिनी यांनी गृहराज्यमंत्री खासदार हंसराज अहिर यांना खुलं पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी परिसरातील अनेक प्रश्न उपस्थित करत याबाबत नागरिकांच्या मनाला वाचा फोडली आहे… जब्बार चिनी यांचे खुले पत्र खास वणी बहुगुणीच्या वाचकांसाठी…
केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराजजी अहिर यांना खुले पत्र
आदरणीय,
नामदार हंसराजजी अहिर यांना सप्रेम नमस्कार,
गेल्या तिन वर्षांपासून सत्तेत असलेल्या मोदी सरकार मधे सध्यस्थितित आपण केंद्रस्तरावरील गृहराज्यमंत्री पदाची जोखमीची जबाबदारी सांभाळत आहात. कांग्रेस राजवटीत उत्तम संसद पटूचा किताब, देशातील सर्वात मोठा कोळसा घोटाळा उघड आदीअनेक मोठी व् लोकोपयोगी कामे आपल्या नावावर नोंदल्या गेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत महत्वपूर्ण अशा गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी आपल्यावर विश्वासाने सोपविली यात तिळमात्रही संशय नाही. अर्थात हे महत्वाचे पद मिळण्यपूर्वीची आपल्या कामाची सचोटी, सामाजिक भान, मोदींना अपेक्षित असलेली ‘स्वच्छता’ या सर्वच बाबी लक्षणीय आहेत. पण….
आपला पक्ष सत्तेत येण्यापूर्वी व्यक्तिश: आपली व् आपल्या पक्षाची भूमिका आपल्याच लोकसभा मतदार संघात बदलेली की काय असा प्रश्न आता सर्वसामान्यांनाही पडू लागला आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्र्याच्या निवासी मतदार संघात फवारणीने मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या राजकीय पुढऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल होतात त्याना सराइत गुन्हेगारांप्रमाणे पोलिस कोठडी दिली जाते मात्र कोळसा तस्करांनी वेकोलि खाणीत घुसून धूड़घुस घालुनही सर्वकाही आलबेल असल्याचे दर्शविण्यात येते. चोरट्या कोळशाचे ट्रक पोलिसांच्या हाती लागुनही आरोपींना साधी कोठडी मीळत नाही. वणी, भद्रावती, चंद्रपुर परिसरातील वेकोलिच्या कोळसाखानी एकामागुन एक बंद होत आहेत. देशी कोळसा तोट्यात असल्याचे कारण पुढे करण्यात येते. तरीही राष्ट्राची ही संपत्ती राजरोसपणे तस्करांच्या चैनीची बनली आहे. आपल्या मतदार संघात कोळशाच्या तस्करीच्या बुरख्याआड भंगार, चोऱ्या, जुगार, मटका, अवैध दारु आदि अवैध बाजार कधी नव्हे एवढा राजरोस सुरु आहे. शेकडो तरुण या व्यवसायातील ‘इझी मनी’ साठी त्याकडे मोठ्या प्रमाणात ओढल्या जात आहे.
या छोटेखानी पत्रातून विस्ताराने सांगणेकेवळ अशक्य आहे. अलिकड़चीच ताज़ी असलेलि प्रतिनीधीक उदाहरणे म्हणून वरील दाखले आहे. त्यावरून तरी आपल्याचं अखत्यारित गृहविभाग असल्याने हा विषय किती गंभीर व भविष्यातील तरुणाईसाठी भयावह आहे हे सहज कळू शकते. त्यामुळे आपणच वणी पासून दिल्ली पर्यंतच्या सरकारातील एक महत्वपूर्ण घटक या नात्याने या सर्व प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी कठोर पाउल उचलावे हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. दीड वर्षात ती खरी ठरली नाही तर कांग्रेस काय नी भाजपा काय? असे म्हटल्याशिवाय कुणीच राहणार नाही.
ताजा कलम: वणी नगर परिषद निवडणुकीत शहराच्या 92 वर्षाच्या इतिहासात २०१६ मध्ये भाजपइतका एकतर्फी कौल कोणत्याच राजकीय् पक्षाला मिळाला नाही. मात्र गेल्या दहा-अकरा महिन्यात समस्त वणीकरांचा पुरता भ्रमनिरास झाल्याचे शहरातून फिरतांना पदोपदी जाणवते.याचाही विचार आत्ताच केलेला बरा ही नम्र विनंती
स्पष्टोक्तिबद्दल क्षमस्व
आपला स्नेही
जब्बार चिनी
नवभारत प्रतिनीधी
अध्यक्ष
दर्पण पत्रकार वेलफेअर असोसिएशन वणी