बाळाच्या अपहरणात रूग्णालयाची कार्यप्रणाली चव्हाट्यावर

कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचा-यांचा गलथान कारभार

0

रवि ढुमणे, वणी: वणीच्या ग्रामीण रूग्णालयातून बाळाची अलगत चोरी झाली अन् सर्वच थक्क झाले. या घटनेने केवळ वणीकर हादरून गेले नाही तर अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. केवळ रूग्णालयाच्या बेजबाबदार पणामुळे मातेच्या कुषीत झोपलेल बाळ अलगत चोरून नेलं गेलं आणि रूग्णालय प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला. यापूर्वीही इथं अशा छोट्या मोठ्या घटना घडल्या आहेत. मात्र राजकीय आश्रय घेत येथील अधिकारी पुर्ववत आहेत. तर अधिका-यांचा वरदहस्त असल्याने कर्मचारी सुध्दा मनमानी करीत आहे. परिणामी अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे रूग्णालयाचा कारभार संशयाच्या घे-यात आला आहे.

मंगळवारी रात्री तीन वाजताचे सुमारास नुसरत बानो या प्रसुती झालेल्या मातेच्या कुषीत झोपलेल्या बाळाचे अपहरण करून त्याला विकण्याचा प्रकार घडला होता. मात्र पोलीसांच्या अत्यंत कुषल कामगीरीने बाळ चोरी प्रकरणाचा छडा अवघ्या काही तासातच लावला, अन बाळ सुखरूप मातेच्या जवळ आले.

बाळाची चोरी करणारा रूग्णालयातील रोजंदारी कामगार
रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक आणि कार्यालयाने रोजंदारीवर सफाई कामगार म्हणून ठेवलेला गणेश वाघमारे जणू काही शासकीय कर्मचारी असल्यासारखा रूग्णालयात वावरत होता. सोबतच तो वार्डात, अधिक्षक कक्ष, मलमपट्टी आदी विभागात बिनधास्त कामे करीत असल्याचे दिसत होते. येथील अधिकारी कर्मचारी त्याला जणू प्रोत्साहनच देत होते. दिवसरात्र रूग्णालयात गणेश वावरत होता. त्यामुळे तेथील रूग्णांची स्थिती त्याला माहिती होती. गणेश हा दामले फैल भागात वास्तव्यास आहे. या भागात राहणा-या रमेशच्या साळ्याला मूल नव्हते. ते दाम्पत्य बाळाच्या शोधात होत. हाच धागा पकडून रमेशने योजना आखली. गणेश व श्रीकांतला सांगीतली. गणेश आणि श्रीकांत रूग्णालयातील प्रसुति विभागात कधी सावज येईल याची जणू वाटच बघत होते. अन सोमवारी त्यांना आशेचा किरण दिसला. योजना तयार झाली. मंगळवारी रात्री नुसरत बोनोच्या कुषीत झोलपेल्या बाळाची चोरी करून त्यांनी ते बाळ आंध्र प्रदेषात राहणा-या दाम्पत्याला विकले.

कर्तव्यावर असलेले अधिकारी अन कर्मचारी
मंगळवारी रात्रीचे सुमारास नुसरत बानोच्या बाळाची अपहरण झाले. बाळाची विक्री सुध्दा करण्यात आली. मात्र त्या रात्री रूग्णालयात डॉक्टरांची उपस्थिती नव्हती किंवा परिचारीका, वार्ड बाय आदी उपस्थित नव्हते. जेव्हा गणेश रूग्णालयात फिरत होता त्यावेळी त्याला कोणीच हटकले नाही. तसंच त्याला एक प्रकारे त्याला समर्थन केले. असे अनेक प्रश्न या प्रकाराने उपस्थित होत आहे.

गेल्या काही महिण्यांपूर्वी हजारो रूपये खर्ची घालत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. मात्र रूग्णालयात तसेच कार्यालयातील कर्मचार्यांच्या कर्तव्यात अनियमितता असल्याने कॅमेरे जणू बंदच केले की काय असा प्रश्न देखील आवर्जून उपस्थित होत आहे. मागील काळात कार्यालयातील कर्मचा-यांनी रूग्णालयाच्या कार्यालयात कॅमेरे लावण्यास मज्जाव केला होता हे विशेष. रूग्णालयातील ऑपरेशन विभागात तर अस्वच्छतेचा कळस आहे. इतकेच नव्हे तर येथील अधिकारी कर्मचारी निर्धारित वेळेत कधीच रूग्णालयात दिसत नाही. तासंतास रूग्णांना डॉक्टरांची वाटच बघावी लागते. काही परिचारीकांनी तर खाजगी सहायक नियुक्त केले आहेत.

म्हणजेच शासकीय कर्मचारी नसताना रूग्णालयात अनेक खाजगी लोक काम करीत आहे. परिणामी रूग्णालयात भरती असलेले रूग्ण असुरक्षीत आहे. ते या घटनेने सिध्द करून दाखवले आहे. रूग्णालयातील डॉक्टरांची मनमानी, कर्मचा-यांचा गलथान कारभार, कार्यालय वेळत उघडत नाही अशा अनेक समस्या भेडसावत असताना येथील रूग्णकल्याण समिती मात्र केवळ नावपुरतीच उरली आहे. परिणामी रूग्णालयातील अधिकारी तसेच कर्मचारी संशयाच्या भोवर्यात आले असून त्यांना राजकीय पाठबळ तर मिळत नाही ना ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकूणच बाळाच्या अपहरणाने रूग्णालयाचा कारभार मात्र चव्हाट्यावर आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.