धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन

वणीत ठिकठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

जितेंद्र कोठारी, वणी: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज शुक्रवारी आंबेडकरी अनुयायी तसेच शहरातील विविध संघटनांद्वारा अभिवादन करण्यात आले. यावर्षी कोरोनामुळे साध्या पद्धतीने मात्र उत्साहात हा दिवस साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भीम नगर, पंचशील नगर, विठ्ठल वाडी, दामले नगर इत्यादी भागातील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला हार घालून व मेणबत्ती प्रज्वलीत करून अभिवादन करण्यात आले. काही ठिकाणी खीर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

सकाळी 10 वाजता आंबेडकरी अनुयायी तसेच विविध संघटनेचे लोक शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शुभ्र कपडे घालून गोळा झाले. इथे उपस्थितांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हारार्पण केले तसेच मेणबत्ती प्रज्वलीत करून अभिवादन केले. त्यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक सुरेश ढेंगळे यांनी सर्वांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. सुत्तपठणाने कार्यक्रमाची सांगता झाली. दरम्यान वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार म्हणून नुकतेच रुजू झालेले शाम सोनटक्के यांनी देखील हारार्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश तेलंग यांनी केले. यावेळी भारतील बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित आघाडी, भीम टायगर सेना इत्यादी संघटनांसह आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती. दुपारीही आंबेडकरी अनुयायी तसेच शहरातील विविध समाजाच्या संघटना यांच्याद्वारे अभिवादन करणे सुरूच होते. 1956 रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना नागपूर येथील दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. त्यानिमित्त हा दिवस दरवर्षी उत्साहात साजरा  केला होता.

पंचशील नगरमध्ये खीर वाटप
पंचशील नगर येथील विहारात आज दुपारी 11 वाजता पंचशील ध्वज फडकवण्यात आला. तिथे बुद्धवंदना झाल्यानंतर खीर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर भीम नगर येथे रॅली रद्द झाल्याने गोळा झालेल्या वर्गणीतून विहारासाठी साउंड सिस्टिम घेण्यात आली. दरम्यान कोरोनामुळे घरीच अभिवादन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना ठाणेदार शाम सोनटक्के
मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती

हे देखील वाचा:

मयूर मार्केटिंगमध्ये दस-यानिमित्त महासेल

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘दसरा धमाका’ ऑफर लॉन्च

Comments are closed.