पांढरदेवी येथे गाय गोधनाच्या दिवशी रंगतो अद्भूत सोहळा

वाजत गाजत निघते गायींची मिरवणूक, गायींचे नृत्य असते प्रमुख आकर्षण

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव तालुक्यातील पांढरदेवी येथे आज शुक्रवारी दिनांक 5 नोव्हेंबर रोजी गोवर्धन महोत्सव साध्या पद्धतीने मात्र उत्साहात पार पडला. पशुपालकांनी गायीची पूजा करून आपल्या गोधनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. वाजतगाजत झालेले गायींची मिरवणूक काढली जाते. तसेच गायींचे नृत्य पाहण्यासाठी केवळ तालुक्यातूनच नाही तर जिल्ह्यातून लोक हा महोत्सव पाहण्यासाठी पांढरदेवी येथे येतात. कोरोनामुळे या उत्सवाला परवानगी नसली तरी गोपालकांनी सर्व काळजी घेत हा उत्सव साधेपणाने साजरा केला.

गेल्या अनेक वर्षापासून मारेगाव तालुक्यातील पांढरदेवी येथील हेमाडपंथी मंदिरात दिवाळीच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गायगोधनला जंगी गोवर्धन महोत्सव होतो. या दिवशी गोपालक फक्त गायींची पूजा करण्यासाठी या ठिकाणी येतात. यावर्षीही शेकडो गायपालकांनी इथे गायीची पूजा केली. 

शेतकरी बांधव गायगोधनाच्या दिवशी आपल्या गाईला सजवून या ठिकाणी वाजत गाजत आणतात. तिथं आणल्यावर त्यांची विधिवत पूजा केली जाते. नंतर गायीला मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर वाद्यांच्या तालावर गायी नृत्य करतात. गुराख्याच्या इशार्यावर काही काळ गायी मंदिरा समोर बसतात. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी तालुक्यातुन जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक येतात. या वर्षीही वाजत गाजत गायींना या ठिकाणी आणण्यात आले व सर्व पारंपरिक विधी उत्साहात पार पाडले गेले.

अशी आहे आख्यायिका….
गोवर्धन महोत्सवाबाबत एक आख्यायिका आहे. असे म्हणतात की पांढरदेवीच्या जंगलात काही काळ पांडवांचं वास्तव्य होतं. तेव्हा याच दिवशी पांडवानी युद्ध जिंकल्यावर गायींना सोबत आणून या ठिकाणी विसाव्यासाठी बसविले. तेव्हा पासून या ठिकाणी गायगोधन यात्रेची परंपरा असल्याची आख्यायिका आहे. दरवर्षी गोवर्धन महोत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो.

या महोत्सवासाठी परिसरातील शेकडो गावातील गोपालकांनी आपल्या गायी पांढरदेवीच्या मंदिरात पूजा करण्यासाठी आणल्या होत्या. कोरोनाचे सावट तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता.

हे देखील वाचा:

मारधाड, ऍक्शनसाठी वणीकरांनो राहा सज्ज… वणीत सूर्यवंशी रिलीज

ऑनलाईनपेक्षाही कमी दरात मोबाईल उपलब्ध

 

Comments are closed.