ज्येष्ठ शिवसैनिक मुन्ना बोथरा यांचे निधन
कडवड, निष्ठावंत शिवसैनिक हरपल्याची शहरातून प्रतिक्रिया
जितेंद्र कोठारी, वणी: ज्येष्ठ व निष्ठावंत शिवसैनिक सुरेंद्र उर्फ मुन्ना बोथरा यांचे अल्पशा आजाराने वणी येथील त्यांच्या राहत्या घरी आज गुरुवारी दिनांक डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. ते तलाव रोड रामपूरा येथील रहिवाशी होते. मात्र अलिकडेच ते वणीतील प्रगती नगर येथे स्थायिक झाले होते. काही काळ त्यांनी पत्रकारिता देखील केली. त्यांच्या निधनामुळे बाळासाहेबांचा एक कडवट शिवसैनिक हरपल्याची प्रतिक्रिया शहरातून व्यक्त होत आहे.
सुरेंद्र नेमीचंद बोथरा हे मुन्ना या नावानेच शहरात परिचीत होते. विद्यार्थी दशेतच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांकडे आकृष्ट होऊन शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. युवा अवस्थेत त्यांनी विद्यार्थी सेनचे उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेत. त्यानंतर ते शिवसेनेचे उप शहर प्रमुख या पदावरही काही काळ होते. अलीकडच्या काळात ते राजकारणापासून दूर असले तरी पक्षाशी ते कायम प्रामाणिक राहिले. त्यामुळेच एक कडवड शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती.
गेल्या काही दिवसांपासून मुन्ना हे आजारी होते. त्यांच्यावर वणी येथे उपचार सुरू होता. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना गेल्या आठवड्यात नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू होता. मात्र प्रकृती आणखीनच खालावल्याने त्यांना आज सकाळी वणी येथे परत आणण्यात आले. आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास प्रगती नगर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.
मुन्ना बोथरा यांना पत्रकारितेची देखील आवड होती. काही काळ त्यांनी विविध माध्यमांमध्ये पत्रकार म्हणून काम केले होते. यासह त्यांनी काही काळ एक साप्ताहिक देखील चालवले. व्यवसायाने ते प्लम्बर होते. मुन्ना यांच्यावर संध्याकाळी 5.30 वाजता मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली व आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे राजकीय क्षेत्र व मित्र परिवारामध्ये शोककळा पसरली आहे.
Comments are closed.