अडेगावमध्ये क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती साजरी
व्याख्यानासोबतच रंगलं पारंपरिक गोंडी ढेमसा नृत्य
देव येवले, मुकुटबन: बिरसा ब्रिगेड, शिव महोत्सव समिती , संभाजी ब्रिगेड, प्रशिक बौद्ध मंडळ, जैन बांधव, यांच्या तर्फे आदिवासी जननायक क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी व्याख्यान आणि आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी सहा वाजता प्रा. साईनाथ मेश्राम यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. तर त्यानंतर पारंपरिक आदिवासी गोंडी ढेमसा नृत्याचा कार्यक्रम झाला.
मोजक्या आदिवासी सैनिकांना सोबत घेऊन बिरसा मुंडा यांनी इंग्रज राजवटीविरुध्द बंड पुकारला होता. त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा म्हणून हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला होता. यावेळी व्याख्यानामधे साईनाथ मेश्राम यांनी बिरसा मुंडा यांचे आदिवासी समुदयास लाभलेले योगदान तसंच समाजातील शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक मागासलेपण यावर प्रकाश टाकला , तसेच समाजाला योग्य दिशा देण्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे आव्हान त्यांनी केले. त्यानंतर पारंपरिक आदिवासी गोंडी ढेमसा नृत्य झाले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. साईनाथ मेश्राम होते तर उद्धाटक म्हणून लता आत्राम सभापती पं.स. झरी तर प्रमूख पाहुणे म्हणुन अरुण हिवरकार सरपंच अडेगाव, प्रवीण काकडे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, सिंधुताई टेकाम, बंडू ऊइके, देवतळे, इरफान शेख, संदीप मेश्राम, अशोक उरकुडे पो.पा., बंडु टेकाम, विमलबाई टेकाम, विजय भेदुरकार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन निलेश मडावी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अडेगाव येथील बिरसा ब्रिगेड, शिव महोत्सव समिती, संभाजी ब्रिगेड, प्रशिक बौद्ध मंडळ, जैन बांधव व गावातील तरुणांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
खाली क्लिक करून पाहा गोंडी ढेमसा नृत्य…