नगर सेवा समिती वणी द्वारा मुन्ना महाराजांचा सन्मान
रवि ढुमणे, वणी: “सन्मान कार्याचा, वैभव शहराचा” या उपक्रमाअंतर्गत नगर सेवा समिती वणी द्वारा रविवारी 19 नोव्हेंबरला प्रसिद्ध प्रवचणकार व समाजसेवक ह.भ.प. मुन्ना महाराज तुगनायत यांचा सन्मान करण्यात आला. साईमंदीरासमोर पहाटे स्वच्छता अभियानानंतर सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
वणी शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा इत्यादी क्षेत्रात निःस्वार्थ सेवा देणा-या व्यक्तींचा नगर सेवा समितीद्वारा सन्मान केला जातोय. या रविवारी वणी शहरातील सामाजिक कार्यात अग्रक्रमाने पुढे असणारे मुन्ना महाराज तुगनायत यांचा सन्मान करण्यात आला.
मुन्ना महाराज तुगनायत यांचा महाराष्ट्र शासनाने दलितमित्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेले रामदेवबाबा मुक बधीर विद्यालयाचे संस्थापक मेघराजजी भंडारी यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठी विज्ञान परिषदेचे तालुका अध्यक्ष प्रा महादेवराव खाडे, गुलाबराव खुसपुरे, न.प.सदस्य राकेश बुग्गेवार, समितीचे अध्यक्ष नामदेवराव शेलवडे, मारोतरावजी चोपणे उपस्थित होते.
याप्रसंगी समितीचे सचिव दिलीप कोरपेनवार, प्रा.भुमारेड्डी बोदकुरवार, रामराव गोहोकार, क्रुष्णराव ठवकर, अरूण वाघमारे, संजूभाऊ पिदूरकर, नंदा शेलवडे, रेखा बोबडे, विणा पावडे, नगर सेवा समितीचे व योगा समितीचे सर्व सदस्य तसेच शहरातील मान्यवर उपस्थित होते.
मुन्ना महाराज तुगनायत यांचा अल्प परिचय
सन २००४ पासून आजपावेतो ते मोक्षधाम समितीचे अध्यक्ष आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात मोक्षधामाचा कायापालट झाला. यासोबतच ते भागवत कथेच्या माध्यमातून प्रबोधनाचं कार्य देखील करतात. तिथं स्वेच्छेने मिळणा-या दानातून त्यांनी ६ मुलींच्या लग्नासाठी मदत केली आहे. गेल्या ११ वर्षांपासून ते यज्ञसेवा समितीचे अध्यक्ष आहे. तसंच रंगनाथस्वामी मंदिराचे मागील ६ वर्षांपासून अध्यक्षपद भूषवून मंदिराचा कायापालट केला आहे. यासोबतच ते जैताई देवस्थानचे विश्वस्त आहे. हास्यकवितांना प्रोत्साहन मिळण्यासाठी दरवर्षी वणीत धुळवळीला महामूर्ख संमेलनाचं ते आयोजन करतात.