जितेंद्र कोठारी, वणी: गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीची बातमी दिल्याच्या रागातून एका अवैध दारू विक्रेत्याने स्थानिक पत्रकाराला शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. मेंढोली येथे हा प्रकार घडला असून या प्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशनला आरोपीविरोधात तक्रार देण्यात आली आहे.
विवेक जगन्नाथ पिदूरकर हे मेंढोली येथील रहिवाशी असून ते एका शाळेवर क्लर्क म्हणून काम करतात. यासह ते ‘वणी बहुगुणी’ या न्यूज पोर्टलचे शिरपूर प्रतिनिधी म्हणून काम करतात. गेल्या काही काळापासून मेंढोली येथे अवैध दारू विक्रीचा महापूर आला आहे. गावातील अवैध दारु विक्री बंद करण्याबाबत वेळोवेळी तक्रार देण्यात आली. मात्र कारवाई न झाल्याने ग्रामपंचायतीने याविरोधात ठराव घेतला होता.
मेंढोली येथील अवैध दारू विक्री विरोधात ‘वणी बहुगुणी’मध्ये बातमी पब्लीश झाली होती. यासह काही वृत्तपत्रामध्येही या संदर्भात बातमी आली होती. रविवारी दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी मेंढोली गावातील एक दुकान चोरट्यांनी फोडले होते. ही बातमी कव्हर करण्यासाठी विवेक पिदूरकर हे घटनास्थळी गेले असता तिथे मयूर पुरुषोत्तम कावडे (26) रा. मेंढोली हा पोहोचला. तिथे आरोपीने विवेक यांच्याशी माझ्या दारूविक्रीची बातमी का दिली असा आरोप करत वाद घातला व अंगावर धावून आला.
आरोपीने विवेक यांना शिविगाळ करत पुन्हा माझ्याबद्दल पेपरमध्ये बातमी दिल्यास जीवे मारील अशी धमकी दिली. घटनेनंतर विवेक पिदूरकर यांनी शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. शिरपूर पोलिसांनी भादंविच्या कलम 504 व 506 नुसार प्रकरणाची नोंद केली आहे.
ग्रामीण पत्रकारिता टिकली पाहिजे – निकेश जिलठे
ग्रामीण पत्रकार हे समाजातील शेवटच्या घटकांचे विषय आपल्या बातमीतून समोर आणत असतात. हल्ली ग्रामीण पत्रकारांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. विवेक सारखे पत्रकार हे गाव खेड्यांच्या लोकांचे प्रश्न आपल्या लेखनीतून मांडतात. अशा पत्रकारांना बातमीमुळे धमकी देणे हे ग्रामीण पत्रकारिता संपवण्याचा प्रकार आहे. याचा ‘वणी बहुगुणी’ निषेध करीत असून पोलिसांनी याविरोधात योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.
– निकेश जिलठे: संपादक, वणी बहुगुणी
मेंढोली येथील अवैध दारूविक्री कधी थांबणार?
मेंढोली येथे सध्या अवैध दारूविक्रीला चांगलेच उधाण आले आहे. गावात वार्ड नं. 1, 2 व 3 मध्ये अवैधरित्या देशी दारु विक्री सुरू आहे. याबाबत अनेकदा तक्रार करूनही कारवाई झालेली नाही. उलट आता अवैध दारु विक्रेत्यांची हिम्मत वाढली असून सत्य समोर आणणा-या पत्रकाराला धमकी दिली जात आहे. पत्रकारांना धमकी देणा-या अशा दारू तस्करांच्या नांगी ठेचणे गरजेचे असल्याची मागणी परिसरातील पत्रकारांनी केली आहे.
Comments are closed.