रुग्णालय, शैक्षणिक संस्था व बहुमजली इमारतीचे फायर ऑडिट करा
वणी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी
जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील शासकीय तसेच खाजगी रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, कोचिंग सेंटर व बहुमजली रहिवासी इमारतीची तात्काळ फायर सेफ्टी ऑडिट करण्यात यावी. अशी मागणी वणी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे याना मंगळवार 22 फेब्रुवारी रोजी निवेदन देऊन केली.
उन्हाळा सुरु झाला की, आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होते. शॉर्ट सर्किट व इतर अनेक कारणाने घडलेल्या आगीच्या घटनेमुळे दरवर्षी करोडो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान व शेकडो निरपराध लोकांना जीव गमवावा लागतो. राज्यात सर्व शासकीय व खाजगी रुग्णालय, कार्यालय, शैक्षणिक संस्थान, सभागृह, उंच इमारती, उद्योगांमध्ये अद्यावत अग्निशामक यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. मात्र शहरातील बहुतांश दवाखाने, कार्यालय व रहिवासी अपार्टमेंटमध्ये अग्निशामक यंत्रणाच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 नुसार, रुग्णालय, शाळा, महाविद्यालय व 30 मिटरहून जास्त उंचीची इमारतींचे नियमित ‘फायर सेफ्टी ऑडिट’ करण्याची जबाबदारी ही त्या इमारतीची मालकी असलेल्या व्यक्ती किंवा संस्थेकडे असते. या कायद्याच्या कलम 3 मधील तरतुदींनुसार संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने परवानाधारक एजन्सीकडून वर्षातून दोन वेळा इमारतीचे ‘फायर सेफ्टी ऑडिट’ करून घ्यायचे आहेत. तसेच तपासणीचे प्रमाणपत्र दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात अग्निशमन विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
शहरातील अनेक रुग्णालय आपल्या इमारतींचे फायर सेफ्टी ऑडिट करून घेण्यास टाळाटाळ करतात. खुद्द अग्निशमन विभागही या तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. अनेक खाजगी दवाखान्यात फायर सिलिंडर हे शोभे साठीच लावलेले दिसून येते. सिलेंडरची वैधता संपली तरी त्याचे रिफिलिंग केले जात नाही. त्यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहरातील सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, शाळा, महाविद्यालय, ट्युशन क्लासेस, रहिवासी अपार्टमेंटची येत्या 10 दिवसात तपासणी करून सेफ्टी फायर ऑडिट करण्यात यावे. तसेच महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण कायदा, 2006 या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या इमारती मालक विरुद्द कायद्यानुसार कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना मनसे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहर अध्यक्ष शिवराज पेचे, विलान बोदाडकर, लोकेश लडके व मनसे कार्यकर्ता उपस्थित होते.
Comments are closed.