बहुगुणीकट्टा: सोन्याचे दाणे… रज्जाकभाईंचे गोल्डन ज्युबिली खारेदाणे
बहुगुणीकट्टामध्ये आज सुनील इंदुवामन ठाकरे यांचे आर्टिकल
‘‘खर्रा’’च्या दाण्याचे अनेक वणीकर शौकीन आहेत. असे असले तरी खारेदाणे हे नेहमीच सिनिअर राहिले आहे. बारमाही उपलब्ध असणारे खारेदाणे खाण्यासाठी कोणताच बहाणा नको. आमच्या वणीत (जि. यवतमाळ) याला खरमुरे म्हणतात. वणी शहराचा इतिहास लिहायचा म्हटला तर खरमुरे आणि रज्जाकभाईंशिवाय हा पूर्ण होणार नाही.
मी हापपॅण्टीत होतो तेव्हापासून हे खारेदाणे खायचो. अगदी 5 व 10 पैशांतही ते मिळायचे. 25 पैशांत तर चिमुकली ओंजळ खरमुऱ्यांनी भरून जायची. रज्जाकभाईंच्या खरमुऱ्यांची तीच जादुई चव अनेक वर्षांनी अनुभवायला मिळाली. एक दिवस भल्या सकाळीच रज्जाकभाई शेंगदाणे आणायला बाजारात निघाले होते तेव्हा भेटले होते. आज मुद्दाम त्यांना भेटायला त्यांच्या ठिय्यावर गेलो. गांधी चौकात टुट्या कमानीजवळ त्यांचा ठेला लागतो. दिवसभर उभे राहूनच ते आपल्या व्यवसाय करतात. सकाळी हातात पिशवी घेऊन रज्जाकभाई निघतात. आठ-दहा किलो शेंगदाणे आणतात. त्याला मिठाच्या पाण्यात भिजविणे, गरम वाळूत भाजणे अशा अनेक प्रक्रिया केल्यावर त्यांचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये लाँच होतं.
आयुष्यात पहिल्यांदा हे खरमुरे खाल्ले असतील तर यांच्याच ठेल्यावर. गावात असतीलही काही. मात्र माझ्या मते सिनिअर म्हणजे रज्जाकभाईच.
आज भेटलो तेव्हा बोललो थोडा वेळ. 10-20 नव्हे तर तब्बल 50 वर्षांपासून त्यांनी वणीकरांना खाऱ्यादाण्याचे शौकीन बनवून ठेवले आहे. क्वचितच कुणी असेल की ज्यांनी रज्जाकभाईंच्या ठेल्यावरील खरमुरे खाल्ले नसतील. तीच क्वॉलिटी, तीच टेस्ट आणि तीच खारेदाणे देण्याची त्यांची स्टाईल आजही तशीच आहे. पांढरा पैजामा, पांढरा शर्ट आणि प्रत्येक ग्राहकाला मिळणारं शूभ्र स्माईल आजही कायम आहे.
मी विचारलं त्यांना कधीपासून या व्यवसायात आहात. तर ते म्हणाले की माझे वडील वामनराव ठाकरे तरूण होते तेव्हा तेदेखील माझ्याकडे खारेदाणे खायचे. पन्नासहून अधिक वर्षे झालीत त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे. बरं वणी पूर्वी लहान होतं. गावगाड्यातलं नातं प्रेमाचं होतं. त्यामुळे अगदी सर्वच जण नावासह एकमेकांना ओळखत. टेलिफोनही मोहल्ला, दोन मोहल्ल्यात एखाद्याकडेच. रज्जाकभाईंना जवळपास सगळं गावच नावाने ओळखतं. तेदेखील जुन्या लोकांना नावासह ओळखतात.
एखाद्या प्राचीन वास्तू, शिल्प, कलाकृतीचा आस्वाद अनेक पिढ्या घेत असतात. पिढी बदलती असली तरी आस्वादामध्ये जनरेशन गॅप नसते. रज्जाकभाईंचे खरमुरे हा आस्वादाच विषय आहे. खरमुरे विकणारे ‘‘टाईमपास खरमुरे’’ अशी आरोळी ठोकत जाहिरात करतात. मात्र रज्जाकभाईंचे खरमुरे म्हणजे टाईममशीन आहे. ते कधीही खाल्ले तर वणीकरांना त्यांच्या त्यांच्या काळात नेतात. ते कधी लेकराने आपल्या माय-बापासोबत, भावाने बहिणीसोबत, बायकोने नवऱ्यासोबत, मित्रांनी दोस्तांसोबत इन्व्हेस्ट केलेल्या क्षणांचे साक्षिदार ठरतात. वणीकरांना 50हून अधिक वर्षांपासून खरमुरे खिलविणारे रज्जाकभाई, तुम्हाला समस्त वणीकरांच्या वतीने अगदी मनापासून धन्यवाद!
– सुनील इंदुवामन ठाकरे
8623053787: 9049337606
++++++++++++++++++
बहुगुणीकट्टासाठी आर्टिकल, कविता पाठवा…