चिकन विक्रेत्यांचा वाद टोकाला, धारदार शस्त्राने हल्ला

दुकानाची तोडफोड, दोन्ही पक्षांवर गुन्हे दाखल

0

विवेक तोटेवार, वणी: वणीत होलसेल चिकन विक्री आणि रिटेल विक्रीच्या वादानं आता हिंसक रुप घेतलं आहे. या वादातून झालेल्या  हल्ल्यात एक जखमी झाला आहे. तर दुस-या चिकन सेंटरची नासधूस करण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, तौकिर अहेमद (55) राहणार विराणी टॉकीज, वणी यांचे दिपक टॉकीज चौपाटीवर अहेमद चिकन सेंटर या नावाने चिकनचा व्यवसाय आहे. अहेमद हे वणीत होलसेल तसेच चिल्लर विक्रेते म्हणून प्रसिद्ध आहे. ते होलसेल भावात चिल्लर विक्री करत असल्याने त्यांच्याकडे इतर चिकन सेंटरपेक्षा भाव कमी आहे. परिणामी त्यांच्याकडे नेहमी ग्राहकांची झुंबड उडालेली असते. हेच या वादाचं कारण ठरलेलं आहे. होलसेल विक्रेते असून होलसेलच्या दरात चिल्लर विक्री का करतात अशी इतर चिकन विक्रेत्यांची तक्रार आहे. त्यातूनच गेल्या काही दिवसांपासून यांच्यामध्ये व इतर चिल्लर विक्रेत्यांमध्ये वाद सुरू आहे.

शनिवारी रात्री दहाच्या सुमारास शेख सलिम शेख हमिद (38) हा चिकन व्यवसायिक धारदार शस्त्र घेऊन अहेमद यांच्या दुकानात गेला. तिथे जाऊन त्यांने अहेमद यांना शिविगाळ करण्यास सुरूवात केली. होलसेलचा व्यवसाय असताना होलसेलच्या भावात चिल्लर विक्री का करतात असा सवाल त्याने अहेमद यांना विचारला. यावरून सलीमचा अहेमद यांच्याशी वाद सुरू झाला.

सुरू असलेल्या या वादात अहेमद यांचा मुलगा मोहम्मद अहेमद (24) हा मध्ये पडला. तेव्हा त्याच्या हातात सत्तूर होती. त्याने सत्तूरने शेख सलीमवर हल्ला केला. त्या हल्ल्यात शेख सलीमच्या हाताला जबर जखम झाली. अशी तक्रार शेख सलीम याने केली आहे. त्यानुसार तौकीर अहेमद, त्यांचा मुलगा मो. अहेमद, नबी अहेमद आणि अहेमद यांचा भाचा यांच्यावर 324 504 506 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुस-या दिवशी शेख सलीमने उगवला सूड
झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास शेख सलिम शेख हमिद (38) मो. इरफान मो. रज्जाक (40) अल्ताफ मदरसा (35) मो. दाऊद मो. इस्माईल (45) हे अहेमद यांच्या दुकानात गेले. तिथे जाऊन त्यांनी दुकानाची तोडफोड केली. तोडफोडीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, वजनयंत्र फोडण्यात आले. तसंच बाहेर ठेवलेले सामान इतरत्र फेकले, तसंच दुकानाची नासधुस केली. यात त्यांच्या दुकानाचं 50 हजारांचं नुकसान झालं. तर पाच हजार रुपये काउंटर फोडून नेले अशी तक्रार अहेमद यांनी केली आहे. त्यानुसार शेख सलीम आणि त्यांच्या साथिदारांवर 294 427 506 व 34 नुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

दुकानाची झालेली नासधुस

या प्रकरणात गुन्हे दाखल झाले असले तरी वृत्त लिहे पर्यंत कुणालाही अटक झालेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही पक्षाला हा वाद आपसात मिटवण्यासाठी समज दिल्याचे कळते. एकूनच वणीत होलसेल आणि चिल्लर चिकन विक्रीच्या व्यवसायातून झालेल्या वादानं हिंसक रूप धारण केलं असून राजरोसपणे शहरात धारधार शस्त्र निघत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.