वणीत शेतकरी मंदिरात ‘जागर स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रम संपन्न
विविध क्षेत्रातील महिलांचा करण्यात आला सन्मान
पुरुषोत्तम नवघरे, वणी: महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी दिनांक 12 मार्च रोजी वणीतील शेतकरी मंदिर येथे ‘जागर स्त्री शक्तीचा’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे निर्भया पथकाच्या प्रमुख सपोनि माया चाटसे व नांदेड येथील उद्योजिका प्रीती जैन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाला डॉ. उजमा शाह, वनश्री वनकर, शाईन शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोनाली झाडे यांनी मी जिजाऊ सावित्री यावर एकपात्री प्रयोग सादर केला. तर दिव्यांग महिला माधुरी धनकासार यांनी आपल्या नृत्याच्या माध्यमातून गोंडी संस्कृतीचे दर्शन घडवले. मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण प्रेमी व सायक्लिस्ट प्रणाली चिकटे, युवा उद्योजक मेघा जैन, माधुरी धनकासार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना नुकतेच निर्भया पथकाच्या प्रमुख झालेल्या सपोनि माया चाटसे यांनी महिलांवर होणा-या अत्याचाराविरोधात घणाघात केला व या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निर्भया पथक सदैव तत्पर राहिल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. वनश्री वनकर यांनी महिलांनी आता व्यवसायातही उतरावे अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ उजमा शाह यांनी रोजचे दैनदिन जीवन जगताना महिलांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण देरकर यांनी केले तर सोनाली जेनेकर व दिशा फुलझेले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपस्थितांचे आभार वैशाली पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रम शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
हे देखील वाचा:
वणीकरांचा मनसेला कौल… पण सर्व विरोधकांची एकी: वारे नगरपालिकेचे भाग 9
Comments are closed.