नसबंदीसाठी ग्रामीण रुग्णालयातुन यावे लागते प्राथमिक आरोग्य केंद्रात
झरी ग्रामीण रुग्णालय बनले शोभेची वास्तू, लोकप्रतिनिधींचे दुुर्लक्ष
रफिक कनोजे, मुकूटबन: झरी येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव आहे. परिणामी नसबंदीसाठी सुद्धा रूग्णांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. यासाठी रुग्णांना खासगी दवाखान्यात किवा ग्रामीण रुग्णालय पांढरकवडा, वणी, प्राथमिक आरोग्य केंद्र मुकूटबन, शिबला येथे नसबंदी उपचार करावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण रुग्णालय झरी केंद्राअंतर्गत साधारणतः ४० ते ४५ गावातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविल्या जातात. ह्या तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे असून आणि झरी येथे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र झरी ग्रामीण रुग्णालयात मागील आठ महिन्यापासुन महिलांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंद आहे. ह्या विभागातील शस्त्रक्रिया खोलीतील भिंतीवरील स्टाइल्स पडत असल्यामुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिला नसबंदी शस्त्रक्रिया करने बंद केले आहे. उपचारासाठी रुग्ण मुकुटबन येथील आरोग्य केंद्रात जातात.
रुग्णालयात आठ महिन्यांपासून नसंबदीची शस्त्रक्रिया झाली नाही. येथील रुग्णालयात आधुनिक यंत्रसामुग्रीचा अभाव, औषधाचा तुटवडा असल्याने आजारी व्यक्तीला योग्य उपचार मिळत नाही. परिणामी नाइलाजास्तव रुग्णाला खासगी दवाखान्यात उपचार करावे लागते. परिसरातील अपघातग्रस्त व्यक्तीला, गरोदर स्त्रीयांना योग्यवेळी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे अन्य खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.
सदर ग्रामीण रुग्णालय परिसरातील गावांच्या केंद्रस्थानी असल्याने सोयीचे आहे. पण येथील तालुका अधिकारी व वैद्यकिय अधिकारी यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे लाखो रुपये खर्चून उभारलेले ग्रामीण रुग्णालय शोभेची वास्तू ठरत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी आहे.
नसबंदी शस्त्रक्रिया गृहामधिल स्टाईल पडत असल्यामुळे नसबंदी होत नसल्याची माहिती मी वरीष्ठ अधिकार्यांना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्राद्वारे लिखीत स्वरूपात दिली आहे. नसबंदी शस्त्रक्रिया गृहामधील स्टाईलचे काम पुर्ण झाल्यावर नसबंदी शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालयात करण्यात येइल – डॉक्टर अभय विरखडे ( अधिक्षक/आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय झरी )