शाळेत खेळताना पडलेल्या चिमुकल्याचा अखेर मृत्यू

संतप्त पालकांनी ऍम्बुलन्स लावली शाळेसमोर.... हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा जीव गेल्याचा पालकांचा आरोप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शाळेच्या मधल्या सुटीत खेळताना एका विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागला होता. त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. वंश उर्फ ओम नीलेश पचारे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान संतप्त झालेल्या पालकांनी शाळा प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करत ऍम्बुलन्सच थेट शाळेसमोर लावली. संतप्त पालकांनी शाळेत मुख्याध्यापकाच्या दालनात ठिय्या मांडला. जोपर्यंत आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. ओमच्या मृत्यूमुळे परिसरात व शाळेत हळहळ व्यक्त केली जात आहे. 

सविस्तर वृत्त असे की वंश उर्फ ओम नीलेश पचारे (7) रा. भोईपुरा वणी हा दुस-या वर्गात शिकत होता. वणीतील तुटक्या कमानी जवळ असलेल्या महात्मा गांधी शाळा क्रमांक 1 मध्ये तो शिकायचा. त्याचे वडील नीलेश पचारे हे मासेविक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी दिनांक 9 जुलै रोजी ओम नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. सकाळी 10 वाजताच्या सुमारास शाळेची मधली सुटी झाली होती. त्यावेळी शाळेतील शिक्षक शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणासाठी बाहेर गेले होते. दरम्यान मुले शाळेत खेळत होती.

सुटीत मित्रांसोबत खेळताना ओम हा खाली पडला. पडल्याने ओमच्या डोक्याच्या मागील भागास गंभीर दुखापत झाली. त्यावेळी शाळेत शिक्षक उपस्थित नसल्याने याची माहिती मुख्याध्यापकास देण्यात आली. शाळेजवळच ओमचे घर असल्याने मुख्याध्यापकांनी एका विद्यार्थ्यासोबत ओमला घरी पाठवले. घरी पोहोचल्यावर ओमच्या वडीलांनी त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलवण्यात आले. शनिवारपासून ओमवर उपचार सुरू होता. मात्र आज सकाळी 6 वाजताच्या दरम्यान उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मुख्याध्यापकाच्या दालनात ठिय्या मांडलेले पालक

शाळेच्या हलगर्जीपणामुळे जीव गेल्याचा आरोप
मुलाला दुखापत झाल्यानंतर पालकांना संपर्क न करता घराजवळील एका मुलासोबत ओमला घरी पाठवण्यात आले. शाळेने वेळेत संपर्क न साधल्याने तसेच तातडीने उपचारासाठी नेले नसल्याने पालक संतप्त झाले आहे. त्यांनी ओमचे अंत्यसंस्कार कऱण्याऐवजी डेथ बॉडी असलेली ऍम्बुलन्स शाळेसमोर लावली. संतप्त पालकांनी शाळेसमोरच ठिय्या मांडला. शाळेने हलगर्जीपणा केल्यानेच ओमचा जीव गेला असा आरोप पालकांनी केला आहे. तसेच आर्थिक मदत करण्याची मागणीही पालकांनी केली आहे.

सदर प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वातावरण चिघळू नये म्हणून तात्काळ पोलिसांची गाडी शाळा क्रमांक 1 मध्ये आली. सध्या ओमचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ओमच्या मृत्यूची बातमी कळताच शाळेत व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  (अधिक माहिती येताच ही बातमी अपडेट करण्यात येईल)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.