धोका : जिल्ह्यातील 16 तालुकापैकी वणीत सर्वाधिक पाऊस
अनेक गावाचा संपर्क तुटला, नदी नाल्यांना पूर
जितेंद्र कोठारी, वणी : राज्यात सर्वदूर पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी ढगफूटी सदृश्य पाऊस होत आहे. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र जिल्ह्यातील 16 तालुकापैकी वणी तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक 401 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. सोमवार 11 जुलै रोजी एका दिवसात तालुक्यात 55 मिमी पाऊस कोसळला. तर मंगळवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. मागील 4 दिवसांपासून सुरु संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी नाले दुभडी भरून वाहत आहे. अनेक गावाचा तालुका मुख्यालयातुन संपर्क तुटला आहे. हजारो हेक्टरवरील कापूस व सोयाबीन पीक पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. वणी शहर व ग्रामीण भागात अनेक घरात पावसाचे पाणी घुसले आहे. ग्रामीण भागात अनेक घरांची पडझड झाल्याचीही माहिती आहे.
अनेक गावांचा संपर्क तुटला : वणी मुकुटबन मार्गावर पेटूरच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आबई फाटा ते शिंदोला रस्त्यावर पुलाचे काम सुरु असून पुलाच्या बाजूने तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता वाहून गेल्याने या मार्गावर वाहनांची रांगा लागल्या आहेत. घोन्सा, नांदेपेरा, कोरपना, गणेशपूर, कायर, पठारपुर मार्गावरील नाल्यांना पूर आल्यामुळे या गावाचाही संपर्क तुटला आहे.
तालुक्यातून वाहणारी पैनगंगा व वर्धा नदीची पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदी काठावरील गावांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टी लक्षात घेता महसूल व पोलीस विभाग अलर्ट मोडवर आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे व तहसीलदार निखिल धुलधर पूर परिस्थितीवर नजर ठेवून आहे.
Comments are closed.