पारंपरिक वाद्य, देखावे आणि भाविकांच्या जल्लोषात निघाली भव्य शोभायात्रा

शोभायात्रेने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाची सांगता, ऍड कुणाल चोरडिया यांनी मानले वणीकरांचे आभार

जितेंद्र कोठारी, वणी: श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शुक्रवारी वणी शहरात निघालेल्या भव्य शोभायात्रेने वणीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. ढोल ताशा, भजनी मंडळाच्या टाळ मृदंगाच्या गजरात व पारंपरिक लोककला-लोकसंस्कृतीचे वणीकरांना दर्शन करत मोठ्या हर्षोल्हासात ही शोभायात्रा शहरातून निघाली. या शोभायात्रेत भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नयनरम्य देखावे, कलापथक यांच्या साथीने निघालेल्या या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या 5 दिवसांपासून वणीत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेने या कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण उत्सवाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल उत्सव समितीचे अध्यक्ष ऍड. कुणाल चोरडिया यांनी वणीकरांचे आभार मानले.

शुक्रवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.30 वाजता वाजता अमृत भवन येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेत सर्वप्रथम घोडा त्यानंतर पुणेरी ढोल ताशा पथक होते. त्यानंतर टांगा ज्यात श्रीकृष्ण तर बग्गीमध्ये श्रीकृष्ण आणि रुक्मिणी विराजमान झाले होते. शेकडो चिमुकल्या गोपिका बनून शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. भजनी मंडळाच्या जय जय राम कृष्ण हरीच्या गजरात ही शोभायात्रा निघाली. शोभायात्रेत गोंडी ढेमसा पथकाने पारंपरिक लोककला सादर केली. ओपन जिप्सी मध्ये बाल कृष्ण तर ट्रॅक्टरमध्ये बाल कृष्ण आणि बाल गोपिका विराजमान झाल्या होत्या.

बहुरुपी पथक ठरले प्रमुख आकर्षण
अमृत भवन येथून वाजत गाजत व पारंपरिक लोककला, लोक संस्कृतीचे दर्शन करत निघालेली ही शोभायात्रा खाती चौक, गांधी चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक, टिळक चौक, खाती चौक असे मार्गकर्मण करत शहरातून निघाली. प्रत्येक चौकात कला पथक आपली कला सादर करत होते. यावेळी शोभायात्रेत असलेले बहुरुपी पथक हे प्रमुख आकर्षण ठरले. त्यांनी दर चौकात पौराणिक कथेवर आधारीत विविध छोटेखानी नाटीका सादर केल्यात. महिशासूर वध या नाटीकेला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. शोभायात्रेची सांगता अमृत भवन येथे झाली. शोभायात्रेच्या आधी भाविकांसाठी अल्पोपहार तर शोभायात्रा संपल्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. शांततेत मात्र उत्साहात निघालेल्या या रॅलीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या शोभायात्रेत शहरातील मान्यवरांसह हजारो भाविक उपस्थित होते.

वणीकरांचे धन्यवाद – ऍड कुणाल चोरडिया
तरुणांनी श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सवाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर हे पहिलेच वर्ष उत्सवाचे होते. जन्माष्टमी निमित्त 5 दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण कालावधीत वणीकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत कार्यक्रमात रंग भरले. त्यामुळे सर्व वणीकरांचे मी उत्सव समितीतर्फे आभार मानतो. यापुढेही समितीद्वारा विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रम आणि कार्यक्रमांना वणीकरांचा असाच प्रतिसाद राहिल याची आम्हाला खात्री आहे.
– ऍड कुणाल चोरडिया, अध्यक्ष: श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वणी

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयूर गोयनका-उपाध्यक्ष, हितेश गोडे -उपाध्यक्ष, सागर जाधव – सचिव, अमोल धानोरकर – सहसचिव, सचिन क्षीरसागर – कोषाध्यक्ष, राजू रिंगोले – सह कोषाध्यक्ष, पियूष चव्हाण – प्रसिद्धी प्रमुख, मयूर गेडाम – सह, प्रसिद्धी प्रमुख, रितेश फेरवाणी – कार्याध्यक्ष, शुभम मदान – सह कार्याध्यक्ष यांच्यासह

आशुतोष पोद्दार, सागर मदान, राजू अडपल्लीवार, कपिल कुंटलवार, मंगेश घोटकर, राज चौधरी, निखिल गोहने, बिट्टू खडसे, निखिल मारखंडे, संकेत रेभे, विनोद खडसे, रोशन जाधव, संदीप जुनघरे, गोविंदा नरपांडे, प्रकाश व-हाटे, विलास आवारी, योगेश आवारी इत्यादींनी परिश्रम घेतले.

पाहा शोभायात्रेतील विविध क्षण….

 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.