शाळा सुरु पण एस.टी. बंद, विद्यार्थ्यांचे होत आहे शैक्षणिक नुकसान
वणी-शिंदोला एस.टी. फेरी सुरु करण्याची मागणी, शिवसेना आंदोलनाच्या पावित्र्यात
जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शाळा महाविद्यालय पूर्ववत सुरु करण्यात आले. मात्र परिवहन महामंडळाने ग्रामीण भागात बंद करण्यात आलेल्या बस फेऱ्या अद्याप सुरु न केल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वणी बस स्थानकावरून शिंदोला, कोलगाव बस फेऱ्या सुरु करण्यासाठी अनेकदा निवेदने देऊनही आगार व्यवस्थापक लक्ष देत नसल्यामुळे शिंदोला परिसरातील विद्यार्थी आता आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहे.
तालुक्यातील शिंदोला परिसरातील मुंगोली, माथोली, कोलगाव, साखरा, परमडोह, चिखली, टाकली, चनाखा, शिवणी, येनक, पाथरी, कुर्ली येथून शाळा, महाविद्यालय व कोचिंगसाठी दररोज शेकडो विद्यार्थी वणीला ये-जा करतात. मात्र एस.टी. बस फेरीच्या अभावी विद्यार्थ्यांना ऑटो, ट्रक किंवा मालवाहू वाहनचालकांना लिफ्ट मागून प्रवास करावा लागतो. वेळेवर शाळा, महाविद्यालयात पोहचत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे.
वणी ते शिंदोला बस फेऱ्या सुरु करण्यासाठी वणी आगार व्यवस्थापकाला तीन वेळा निवेदन देण्यात आले. मात्र आगार व्यवस्थापकाच्या वेळकाढू धोरणामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहे. शिंदोला परिसरातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांनी सोमवार 22 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी व आगार व्यवस्थापक याना पत्र देऊन शिंदोला ते वणी व वणी ते शिंदोला पर्यंत दिवसात 6 फेऱ्या तातडीने सुरु करण्याची मागणी केली आहे. 24 ऑगस्ट पर्यंत बस सेवा सुरु न केल्यास 25 ऑगस्ट रोजी स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांसह शिवसेना तीव्र आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला आहे.
Comments are closed.