विवेक तोटेवार, वणी: वरोरा बायपास वरून सकाळच्या मॅकरून व स्वर्णलीला शाळेची वाहने जातात. या हायवेवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असणे ही नित्याचीच बाब आहे. काही वर्षांपूर्वी याच रस्त्यावर एक भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून या नांदेपेरा चौफुलीवर शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी वाहतूक कर्मचारी कर्तव्यावर असावा अशी मागणी होती. परंतु या ठिकाणी कुणीही उपस्थित राहत नाही. त्यामुळे वाहतूक प्रशासन पुन्हा एखादा अपघात झाल्यावरच जागे होणार काय? असा प्रश्न विचारला जात आहे.
सकाळी 7 ते 8 वाजताच्या दरम्यान वणी-वरोरा रोडवरून मॅकरून व स्वर्णलीला शाळेची वाहने जातात. सोबतच रेतीची वाहने व गौण खनिज वाहने याच रस्त्यावरूनच भरधाव चालतात. रस्त्याच्या कडेला लागलेल्या ट्रकच्या रांगेतून अचानक एकादे वाहन रस्त्यावर येताना मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र वाहतूक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी 23 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता दरम्यान याच वरोरा बायपासवर अपघात झाला. यामध्ये ऑटो क्रमांक MH 29 AM 0698 ला मागून ट्रक क्रमांक MH 34 BG 6427 ने जोरदार धडक दिली. या धडकेत दोन विद्यार्थी स्नेहा हरी बलकी (18) व शिवम श्रीकांत मेश्राम (11) जखमी झाले होते.
वणी-वरोरा रोडवरीलन वाहतुकीच्या समस्येबाबत वाहतूक विभागाला अनेकदा निवेदने देण्यात आले. मात्र तरीही या ठिकाणी वाहतूक विभागाचा एकही कर्मचारी कर्तव्यावर राहत नाही. सुजाण नागरिकांपासून ही बाब लपलेली नाही. पालक आपल्या मनावर दगड ठेऊन मुलांना शाळेत पाठवीत असल्याची व्यथा एका पालकानी बोलून दाखविली. वाहतूक विभाग झोपेतून जागे होणार की पालकांना आता आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असा सवाल पालक विचारीत आहे.
Comments are closed.