शिंदोला परिसरातील विद्यार्थ्यांना पोळ्याच्या पर्वावर एटी महामंडळाची भेट
सुरू होणार शिंदोला-वणी बससेवा, सर्वपक्षीय नेत्यांच्या एकजुटीला यश
तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला ते वणी बससेवा सुरू नसल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यासह सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर समस्या दूर करण्यासाठी शिंदोलाचे सरपंच विठ्ठल बोंडे, माजी आमदार विश्वास नांदेकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमूख संजय निखाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी बस सुरू करण्याबाबत मागणी रेटून धरली होती. अखेर आगार प्रमुखांनी गुरुवारी रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी त्वरित बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले. सध्या शाळेला दोन दिवस सुट्टी असल्याने सोमवारपासून बस सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वणी तालुक्यातील शिंदोला परिसरातील कळमना, पाथरी, परमडोह, चिखली, टाकळी, गोवारी, पार्डी, येनक, शेवाळा, येनाडी, कोलगाव, साखरा, मुंगोली, माथोली, कुर्ली आदी गावातील अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी वणी येथील कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. मात्र, बससेवा उपलब्ध नसल्याने दररोज कॉलेज मध्ये उपस्थित राहणे शक्य होत नाही. तर अनेकांना दुचाकीचा व ऑटोचा खर्च परवडणारा नाही. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते.
सामान्य नागरिकांनाही दुचाकी, ऑटो किंवा अन्य खासगी वाहनाने जीव धोक्यात घालून तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त येजा करावी लागते. म्हणून सदर समस्या दूर करण्यासाठी सरपंच विठ्ठल बोंडे, लुकेश्वर बोबडे, प्रीतम बोबडे यांनी 10 जून रोजी वणी आगार प्रमुखांना पत्र दिले. 29 जुलैला पुन्हा स्मरणपत्र दिले. यासह शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर, उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, भाजपाचे विजय पिदूरकर आदी पक्षनेत्यांनीही सदर मागणी निवेदनाद्वारे केली. तसेच बस सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला.
परिणामी मागणीला बळ मिळाले. मागणीची दखल घेत गुरुवारी सकाळी आगार प्रमुख साळवे यांनी रस्त्याची पाहणी केली. याप्रसंगी त्वरित बससेवा सुरू करणार असल्याचे सांगितले. यामुळे परिसरातील गावांसह बोरगाव, खांदला, गोपालपूर येथील विद्यार्थ्यांना बससेवेचा लाभ होणार आहे. मागणीची पूर्तता होत असल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखांचे आभार मानले.
Comments are closed.