सुविधा कापड केंद्राला चोरट्यांनी लावली आग? आगीच्या प्रकरणात चोरीचा ऍन्गल समोर
गल्ल्यातील सुमारे 10 लाख रुपये गायब, कोट्यवधींचा माल आगीत जळून खाक
जितेंद्र कोठारी, वणी : वणीतील बाजारपेठेतील प्रख्यात सुविधा कापड केंद्र या कपड्याच्या शोरूममध्ये मध्यरात्री 2 वाजता सुमारास भीषण आग लागली. या आगीत दसरा व दिवाळीसाठी आणलेला कोट्यवधींचा माल तसेच शोरूम जळून खाक झाले आहे. विशेष म्हणजे ही आग लागलेली नसून चोरट्यांनी लावल्याचा ऍन्गल आता पुढे येत आहे. त्या दिशेने वणी पोलीस तपास करीत आहे.
सविस्तर वृत्त असे की वणीतील मुख्य बाजारपेठेत जुन्या स्टेट बँकेजवळ सुविधा हे कपड्याचे दुकान/शोरूम आहे. तीन माळ्याच्या या दुकानात आधी दोन माळ्यामध्ये दुकान तर तिस-या माळ्यावर दुकानाचे मालक प्रशांत व प्रवीण गुंडावार हे आपल्या कुटुंबासह राहत होते. मात्र कोरोना नंतर दुकान मालक दुसरीकडे राहायला गेले. त्यामुळे तिन्ही माळ्यावर आता शोरूम आहे. तर चौथ्या माळ्यावर शेड आहे.
मंगळवारच्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास (दिनांक 27 सप्टेंबर) रोजी एटीएम समोरील एका व्यक्तीला दुकानाला आग लागल्याचे आढळून आले. त्याने याची माहिती लगेच जवळ असलेल्या एका पानटपरी चालकाला दिली. पानटपरी चालकाने याची माहिती दुकान मालकाला दिली. आग लागल्याने तातडीने फायर ब्रिगेडला बोलावण्यात आले. मात्र शोरूममध्ये कपडे तसेच शोरूमचा दुसरा माळा व त्याच्या पाय-या या लाकडाच्या असल्याने आगीने तात्काळ भीषण स्वरूप धारण केले.
आगीची भीषणता लक्षात घेऊन बाहेरगावाहून फायर ब्रिगेड बोलावण्यात आल्या. बिल्डींगच्या दोन्ही बाजूला घरे असल्याने आग विझवण्यास अडचण येत होती. त्यामुळे अखेर चिंडालिया कॉप्लेक्सच्या बाजूने दुकानाची भींत फोडून त्यातून फायरब्रिगेडने पाण्याचा पाईप टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री दोन वाजता लागलेली आग आटोक्यात यायला सकाळचे 6 वाजले. या आगीत पहिला व दुसरा माळा जळून खाक झाला आहे. दसरा व दिवाळी लक्षात घेऊन दुकानात मोठ्या प्रमाणात माल आणण्यात आला होता. हा सर्व माल जळून खाक झाला आहे. यात गुंडावार यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
आग विझवण्यात वणी फायर ब्रिगेडचे देविदास जाधव, शाम तांबे, दीपक वाघमारे तसेच उकणी डब्लूसीएलच्या फायरब्रिगेडचे राशीद खान, सुभाष प्रजापती यांनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच घटनास्थळावर आलेल्या काही लोकांचीही आग विझवण्यासाठी मदत झाली. सकाळी वणीमध्ये आगीची बातमी पसरताच वणीकरांंनी दुकानासमोर एकच गर्दी केली होती. दरम्यान ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा कयास लावला जात असताना यात आता चोरट्यांचा ऍंगल समोर आला आहे.
गल्ल्यातील पैसे गायब, चोरट्यांनी लावली आग?
दरम्यान पाहणी केली असता गल्ल्यातील सुमारे 10 ते 12 लाख रुपये गायब आहेत. तसेच बिल्डिंगच्या मागच्या बाजूने एक कपड्याचे थान लोंबकळत होते. त्यावरून या प्रकरणात चोरट्यांची एन्ट्री झाली. रात्री शटर बंद करण्याच्या आधी चोरटे आत होते. तिस-या माळ्याच्या शटरला आतून टाळे लावलेले होते. त्यांनी मध्यरात्री शटर तोडून दुस-या व पहिल्या माळ्यावर प्रवेश केले. गल्ल्यातील पैसे चोरले. त्यानंतर त्यांनी मागच्या बाजूने कपड्यांच्या थानाची दोरी करून त्याच्या साहाय्याने ते खाली उतरले. त्यांनीच पळून जाण्याच्या आधी आग लावली असा अंदाज लावला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच सकाळी पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळावर हजर झाले. घटनेचा पंचनामा झाला असून पोलीस चोरीच्या ऍन्गलने तपास करीत असल्याची माहिती आहे. दरम्यान चोरटा एकटा होता की टोळी तसेच परिचित होते की अनोळखी याचा देखील तपास पोलीस करीत आहे.
Comments are closed.