वणीतील शुभम खोकले यांना MBA मध्ये सुवर्णपदक
पुणे विद्यापिठाच्या दीक्षांत सोहळ्यात गोल्ड मेडल प्रदान
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील शुभम अरुण खोकले याने पुणे विद्यापिठाच्या एमबीए अभ्यासक्रमात गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. नुकताच पुणे येथे झालेल्या पदवीदान सोहळा पार पडला. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्याला गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले. शुभम पुणे येथील स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया बिझनेस, या कॉलेजचा विद्यार्थी होता.
शुभम हा गुरुपीठ इंग्लिश मीडियम स्कूल वणीच्या संचालिका आशा अरुण खोकले व अरुण खोकले यांचा मुलगा आहे. शुभमने शालेय शिक्षण वणीतील जनता विद्यालयातून घेतले. 10 मध्ये चांगले गुण घेऊन पास झाल्यानंतर त्याने 11 वीसाठी हैदराबाद येथील सुप्रसिद्ध नारायणा कॉलेजमध्ये विज्ञान शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर शुभमने पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल ब्रँचमध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवली. पदवीनंतर काही काळ अनुभवासाठी शुभमने मुंबई व पुणे येथे विविध कंपनीमध्ये नोकरी देखील केली.
मात्र उद्योजक होण्याचे स्वप्न असल्याने त्याने एमबीएचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने पुणे येथील सुप्रसिद्ध इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया बिझनेस येथे प्रवेश घेतला. दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्याने फूड इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याने गणेशपूर येथे लक्ष्मी इंडस्ट्रीज नावाने एक उद्योग देखील सुरू केला.
दरम्यान एमबीएचा निकाल लागला. त्यात विद्यापिठात अव्वल ठरत त्याने गोल्ड मेडल मिळवले. नुकतेच त्याला पुणे विद्यापिठाच्या पदवीदान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. शुभम आपल्या यशाचे श्रेय आई आशा खोकले, वडील अरुण खोकले तसेच नातेवाईक, मित्रमंडळी यांना देतो.
Comments are closed.