जितेंद्र कोठारी, वणी: पत्रकार आसिफ शेख यांच्यावर चोरट्यांनी केलेल्या हल्ल्याचे वणीच्या पत्रकारिता क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले. शहरातील सर्व पत्रकार संघटनेने या हल्लाचा निषेध करत ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या बदलीची मागणी लावून धरली होती. त्यातच या प्रकरणात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी देखील पत्रकारांची बाजू उचलून धरत ठाणेदारांच्या बदलीची पोलीस अधिक्षक व डीआयजी यांच्याकडे केली होती. शहरातील वाढता विरोध पाहून महल्ले हे वैद्यकीय रजेवर गेले. त्यामुळे त्यांची आता वणी पोलीस ठाण्यात परतण्याची आशा संपुष्टात आली आहे. आता वणी पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदारपदी कोण येणार याची वणीकरांना प्रतीक्षा लागली आहे.
ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांची आधीच आंतरजिल्हा बदली झालेली आहे. मात्र मध्यंतरी शासनाने यावर स्टे आणल्याने त्यांची बदली रखडली होती. त्यातच शहरात सातत्याने सुरू असलेले घरफोडीचे सत्र दुचाकी चोरी, अवैध धंद्यात झालेली वाढ, तक्रारी न घेणे, गुन्ह्याची तीव्रता कमी दाखवणे यामुळे ते चांगलेच वादग्रस्त ठरले होते. विशेष म्हणजे आजच बाळासाहेबांची शिवसेना यांनी देखील ठाणेदारांच्या बदलीसाठी निवेदन दिले होते. याचा एकत्रीत परिणाम होऊन वणी पोलीस ठाण्याला नवीन ठाणेदार मिळणार हे निश्चित झाले आहे.
शहरात सातत्याने सुरू असलेले घरफोडीचे सत्र तसेच दुचाकी चोरी, अवैध धंद्यात झालेली वाढ यामुळे ठाणेदारांना स्थानिकांच्या रोशाला बळी पडावे लागले होते. त्यातच बुधवारी दिनांक 12 तारखेच्या पहाटेच्या सुमारास वणीतील पत्रकार आसिफ शेख यांच्या घरी चोरी करत चोरट्याने त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याचे तीव्र पडसाद वणीत उमटले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था ठेवण्यात ठाणेदार अपयशी ठरले आहे. असा आरोप करत पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेत ठाणेदारांच्या बदलीची मागणी केली. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी देखील ठाणेदारांच्या बदलीसाठी हालचाली केल्यात. त्यातच डॉ. महेंद्र लोढा यांनी ठाणेदारांनी पाच लाखांची लाच मागितल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे लवकरच त्यांची बदलीची उलटी गिनती सुरू झाली होती.
ठाणेदारपदी कोण येणार याची उत्सुकता
सध्या शहरात गुन्हेगारी वाढली आहे. अवैध धंद्याने डोके वर काढले आहे. शहरात घरफोडीचे सत्र सुरू आहे. दुचारी चोरीने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेले सुविधा हे कपड्याचे शोरूम चोरट्याने फोडून 25 लाखांची रोकड चोरली व दुकानाला आग लावली होती. अशा विविध महत्त्वाच्या प्रकरणाचा छडा अद्याप लागलेला नाही. त्यामुळे नवीन येणा-या ठाणेदारांकडून अनेक अपेक्षा केल्या जात आहे. वणी पोलीस ठाण्याची क्रिम ठाणे म्हणून ओळख आहे. त्यामुळे काहींनी ठाणेदार पदासाठी फिल्डींग लावली असल्याचीही माहिती आहे. दिवाळीच्या आधी वणीला नवीन ठाणेदार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे देखील वाचा:
हिंदू मुलीला दत्तक घेऊन कन्यादान करणारे सत्तारमामू फुलवाले यांचे निधन
Comments are closed.