ओबीसींना आंबेडकरवाद सत्ताधीश बनवू शकतो – डॉ.प्रल्हाद लुलेकर
बाजोरीया लॉन्स येथे बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन
जितेंद्र कोठारी, वणी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचेच कैवारी नव्हते, तर ते संपूर्ण देशाचे नेते होते. देशातील 85 टक्के बहुजनांचे ते उद्धारकर्ते होते, आंबेडकरवादच ओबीसींना सत्तेपर्यंत नेऊ शकतो. असे रोखठोक प्रतिपादन औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले. स्थानिक बाजोरिया लॉनमध्ये आयोजित बळीराजा व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी स्मृतीशेष रामचंद्र जागोजी सपाट स्मृती प्रित्यर्थ ‘दलितेत्तरांसाठी बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर ते बोलत होते.
येथील शिव महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यंदा व्याख्यानमालेचे हे आठवे वर्ष आहे. या व्याख्यानमालेतील पहिल्या दिवशीच्या बोलताना डॉ. प्रल्हाद लुलेकर म्हणाले की, बाबासाहेब यांचा जन्म मुळात दलित समाजात झाला. त्यामुळे दलितांची दुःख, हालअपेष्टा त्यांनी स्वतः जवळून अनुभवली. दलितांच्या उद्धारासाठी ते आईच्या काळजाने झटले म्हणूनच ते खऱ्या अर्थाने ‘भिमाई’ ठरतात.बाबासाहेब यांनी शेतकरी, कामगार व स्त्रियांच्या उद्दाराकरिता अतुलनीय कार्य केले. महात्मा फुले यांच्यानंतर शेतकऱ्यांसाठी बाबासाहेबांनी जेवढे कार्य भारतात केले तेवढे दुसरे कोणीही केले नसल्याचे त्यांनी नमूद केले.
व्याख्यानमालेचा आरंभ कृषी संस्कृतीचा उद्धारकर्ता बळीराजा, माँ जिजाऊ आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना हारार्पण व दीप प्रज्वलनाने झाला. नुकतेच भारत-चीन सीमेवर शहीद झालेले नजीकच्या मुर्धोनी येथील लेफ्टनंट कर्नल वासुदेव दामोदर आवारी यांना याप्रसंगी आदरांजली वाहण्यात आली. जिजाऊ वंदनेचे गायन दिगंबर ठाकरे व जयंत कुचनकर यांनी केले. प्रास्ताविक शिव महोत्सव समितीचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. करमसिंग राजपूत यांनी, संचालन सोनाली जेनेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवमहोत्सव समितीचे प्रसिद्धी प्रमुख संदीप ठाकरे यांनी मानले.
विचारपिठावर अध्यक्षस्थानी शिव महोत्सव समिती वणीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी, प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. चेतन खुटेमाटे, उप विभागीय अधिकारी वणी डॉ.शरद जावळे, ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार, सरस्वती हायस्कूल मुकुटबनच्या मुख्याध्यापिका ममता जोगी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. व्याख्यानमालेला वणी, झरी, मारेगाव तालुक्यातील व चंद्रपूर येथील श्रोत्यांनी मोठी उपस्थिती दर्शवली.
Comments are closed.