संगणक परिचालकांचा हिवाळी अधिवेशनावर मोर्चा

वणी उपविभागातून मोर्चात संगणक परिचालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने आज दिनांक 21 डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर विविध मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आला. ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांना 6970 रुपये असे तुटपुंजे मानधन दिले जाते. या अत्यल्प मानधनात कुटुंब चालवणे कठिण आहे. मानधनात वाढ करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील संगणक परिचालकांनी नागपूर येथे मोर्चा काढला. मंगळवारी या संदर्भात वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले होते. 

ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून पंचायतराज संस्थांच्या ई प्रकल्पाअंतर्गत कारभारात पारदर्शकता यावी यासाठी तांत्रिक कामासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2016 पासून ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिनिस्त आपले सरकार सेवा केंद्र या नावाने प्रकल्पातून ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांना 6930 रुपये मानधन दिले जात आहे.

ग्रामपंचायतीतील तांत्रिक कामाची जबाबदारी संगणक परिचालकाकडे असते. जन्म-मृत्यू आणि वेगवेगळे दाखले देणं, ग्रामपंचायतीचा खर्च आणि वसुलीचा दररोजचा अपडेट ठेवणं ही सगळी कामं संगणक परिचालक करतात. याशिवाय शेतकरी कर्जमाफी किंवा इतर शासकीय योजनांची ऑनलाईन माहिती भरायचं कामंही ते करतात. पण, याबदल्यात मिळणा-या तुटपुंज्या मानधनात घर कसं चालवायचं असा सवाल संगणक परिचालक उपस्थित करीत आहे.

यावलकर समितीच्या शिपारशीनुसार ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधामध्ये लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदावर सामावून घेऊन 1948 नुसार मासिक वेतन द्यावे अशी प्रमुख मागणी संगणक परिचालकांची आहे. मोर्चासाठी संगणक परिचालक संघटनेचे वणी तालुकाध्यक्ष राजकुमार वडस्कर, उपाध्यक्ष विनोद सोनटक्के, सचिव भाऊराव देवतळे यांच्यासह वणी उपविभागातील संगणक परिचालक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.